Tuesday, November 2, 2010

मुलतानी ते भैरवी

बेदिल हा दिलरुबा जिवाचा छळते ही बेचैनी
आज दिलाच्या सुलतानास्तव झुरते ही मुलतानी!

परवाच पेपर मध्ये वाचलं, की 'सं. कट्यार काळजात घुसली' मधली ही रागमाला आता दिवाळी अंकामध्ये ऐकायला मिळेल. बरंच वाटलं. वाचून. (म्हणजे इंटरनेट वर, एमपी 3 मध्ये ऐकता येईल)

खरं तर माझा आणि शास्त्रीय संगीताचा फार म्हणावा असा संबंध नाही. माझी ताई हार्मोनीयम शिकायची तेव्हा मी पण थोडीफार हौस फिटवून घेत असे इतकंच. पण नाट्यसंगीत वगैरे ऐकायला अगदी ९-१० वर्षांची असल्यापसून आवडायचं.

कळायचं काही नाही. पण त्या वयातही फिल्मी गाणी कमीच ऐकली. पुढे ती कमी भरून काढली ती redio वर लागणारा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ऐकून. मग तेव्हा मात्र खूप ऐकली. पण नाट्यगीत काहीतरी वेगळंच आहे हे मात्र समजलं होतं तोवर.

पुढे ११ वी-१२ वीत असताना, पुण्याला, माझी रूम मेट रोज सकाळी उठून रियाझ करायची. आमच्या रूम च्या जवळच तिच्या आत्त्याची खोली होती. आत्या नवीन घरी रहायला गेल्यावर ती खोली म्हणजे सुचाची म्युझिक रूम झाली होती. पहाटे तिचा रियाझ ऐकू आला की जीव अगदी एवढा एवढा होऊन जाई! सुरेख लागलेला तानपुरा पहाटे पहाटे ऐकायचं भाग्य होतं माझं! मलाही अभ्यासाला बसताना अगदी फ्रेश वाटायचं. तिची बहिण सीमा तबला वाजवायची तेही तितकाच छान वाटायचं. आम्ही शाळेत असताना कार्यक्रमात तबला-पेटी असे, पण असा हा 'रियाझ' ऐकतोय म्हणजे काहीतरी मोठं काम करतोय असा वाटे मला. माझी १२वी असल्यामुळे जास्त थांबत नसे मी रूम वर, लायब्ररी मध्ये जाऊन दिवसभर अभ्यास झाला कि मग संध्याकाळी क्लास, मेस मधून जेवण वगैरे आटपून येत असे मी. पण त्यामुळे सकाळी जाताना आणि रात्री आल्यावर या दोघींचं गाणं ऐकून दिवस सुखात जायचा. गाण्याची ओढ किंवा चटक अशी लागली. मग ती कमी झालीच नाही.

डिप्लोमा साठी परत रत्नागिरीला आले आणि मे महिन्यात नाटक बघायची हौस करून झाली. 'कट्यार..' तेव्हाच पाहिलं मावशीबरोबर जाऊन. मानापमान, स्वयंवर, एकाच प्याला, शांतीब्रह्म...आणि नाट्य संगीताचे कार्यक्रम भरपूर ऐकले. रागमाला तेव्हाच ओळखीची झाली. पुढे प्रत्येक रागाशी तोंडओळख झाली. गाणं शिकणं शक्य नव्हता, आणि हट्टही नव्हता. जे मिळत होतं त्यात समाधान होतं. पण हळूहळू माझ्या संग्रहात तबला, सतार, पेटी, बासरी, संतूर अशी rekordings वाढत होती. सीडीचा जमाना आल्यावर तर अनेक गोष्टी एका सीडी मध्ये आल्या. माझं संग्रह वाढला.

अनेक दिग्गज मंडळींचे सूर कानावर पडू लागले. आईचा कायम पाठींबा होता. बाबाही कधी काही बोलले नाहीत. फक्त अभ्यास होतोय न याकडे मात्र त्यांचा लक्ष असे. त्यात काही कमी-जास्त वाटला तर मात्र ते सांगत असत, आता पुरे झाला तुमचा गाणं! पण सगळं समजून घेऊन त्यांनी एक छान गोष्ट करून दिली आम्हाला. झोपायच्या जागेजवळ एक सॉकेत केला, टेप रेकोर्डेर ठेवून गाणी ऐकायला. "संगीत झोप" घ्या म्हणायचे आम्हाला!

छापून आलेलं वाचायचं असं व्रत माझं, त्यामुळे पेपर मधले गाण्याची माहिती सांगणारे लेख सुद्धा वाचून झाले त्या वेळी. मग अच्युत गोडबोले-सुलभ पिशवीकर यांची लेखमाला, प्रभा अत्रेंचं पुस्तक, अरुण दाते यांचं आत्मचरित्र, संगीत नाटकांबद्दल रंजक माहिती असं सगळं वाढायला लागलं. मजा येत गेली.

आज राहुल देशपांडे यांनी गायलेली एक बंदिश ऐकली (बंदिश आणि चीज यातला फरक मला माहित नाही) आणि हे लिहावंसं वाटलं. आत्ताही काम करताना मे नेट वर किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, झाकीर हुसेन, अशा कोणाचंतरी रेकोर्डिंग लावून ठेवते.

आयुष्यात जसं पुस्तक नकळत शिरलं आणि आयुष्याचा एक भाग होऊन राहिलं, तसंच गाणंही नकळत आलं आणि मनाशी सूर जोडले गेले. मी इंजिनिअर आहे ही जशी ओळख, तशीच मला गाणं ऐकायची आणि पुस्तकांची आवड आहे ही सुद्धा ओळख मिळाली मला!

Friday, October 1, 2010

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

आज "रीटा" या सिनेमा चे ट्रेलर्स बघत होते. बघायचा आहे अजून हा सिनेमा. खरं तर बरेच दिवस झालेत तो रिलीज होऊनही...पण राहिलंय बघायचा. आणि खरं सांगायचं, तर ही रीटा मला अनोळखी नाही. १० वी नंतरच्या सुट्टीत मी भस्म्या झाल्यासारखी पुस्तकं वाचली होती. त्यातलंच हे---रीटा. १० वर्षं झाली ते वाचून. सगळा तपशील नाही आठवत त्यातला, आणि तो सिनेमा बघूनही समजेलच, पण नवल वाटतं ते एका गोष्टीचं. या विषयावरचं असं पुस्तक मी १६ व्या वर्षी वाचलं होतं..

तेव्हा काही फार समजलं नव्हतं. आणि 'हे असं का..याचा अर्थ काय आहे..असं खरंच घडतं का...असेल तर का घडतं...' असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत हे मात्र खरं. तसे मला प्रश्न कमीच पडतात अशा गोष्टीत. अनेक प्रश्नांची उत्तरं काळाबरोबर मिळत जातात, आणि ती तेव्हाच मिळणं योग्य असतं असं मला वाटतं. त्यामुळे आज जेव्हा जाणवतं, कि अरे! ही गोष्ट तर आपल्याला आधीच माहिती होती...तेव्हा कळतं की त्याचा उत्तर हे असं आहे..
त्ये सुट्टीत "कोसला" वाचली होती. तीही अशीच अंगावर आली होती. आणि मग इरावती कर्व्यांच "युगांत", थोड्या वर्षांनी "ब्लास्फेमी", "नॉट विदाउत माय डॉटर" हीपण झाली वाचून. कोसला तर अजूनही कळेल का शंकाच आहे. म्हणजे जे काही वाचतेय ते असं भयंकर वाटून सगळ्या बाजूने मला घेरतंय ही भावना आजही होईल अशी धास्ती वाटते. असं अनेक पुस्तकांचं होतं. "काश्मीर-धुमसते बर्फ" हे तर मी ५ पानांच्या पुढे वाचूच नाही शकले.
तसा मी खूप वाचलंय हे आता लक्षात येत. रिकाम्या वेळात जेव्हा हि सगळी पुस्तकं आठवतात तेव्हा जाणवत, आपण खरंच बराच वाचलंय. मन सुखावतं या जाणीवेने.

आज मला नक्की काय सांगायचं आहे, माहित नाही. पण खूप विचारांचा कल्लोळ आहे हा. एक सिनेमा निमित्त ठरला, आणि पुस्तकांची आठवण झाली. खरं तर आईची पण. तिने कधी सवय लावली समजलंच नाही. लहान असताना किशोर, कुमार हि मासिकं, चंपक, ठकठक, चांदोबा...पेपर मधल्या बातम्या, चिंटू....आणि अगदी रामरक्षा, मनाचे श्लोक, सगळं सगळं...
विषयाला कधीच बंधन नव्हतं. विनोदी, गंभीर, देवाचं, ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक, कथा, छोटे लेख...किती नि काय!

पुढे मोठं होताना हे सगळं कमी होण्या ऐवजी विस्तारत गेलं. पु लं ची मोहिनी होतीच, पण स्वाभाविक पणे वाचली जाणारी मृत्युंजय, छावा, राजा शिवछत्रपती, राधेय अशी सगळी पुस्तकं वाचून झाली. पेपर मध्ये फक्त राजकारण नसतं, अजून खूप चांगल्या गोष्टी असतात हे लोकसत्ता वाचून समजलं. शनिवार-रविवारच्या पुरवण्यांची वाट बघायला लागले मी. निबंध लिहिताना हे उपयोगी पडेल असं तर वाटायचंच, पण त्याहीपेक्षा हे आपल्याला आवडतंय हि जाणीव जास्त होती. ९ वर्षांची असल्यापासून श्रीमद भगवद्गीता वाचता आणि म्हणता येत होती, त्यामुळे मोठेपणी काही वाचताना अनेक गोष्टी लगेच लक्षात येत. त्यातले पौराणिक संदर्भ आठवत जे लहान असताना आजीने, किंवा गीता शिकवताना फडके सरांनी सांगितलेल्या गोष्टीत असत...आपण आतून कुठतरी समृद्ध होतोय असं वाटायचं.
यातल्या अनेक गोष्टींचं श्रेय आईला आणि बाबांना जातं. खरं तर मला गीता वगैरे शिकायचीच नव्हती. गीता काय असते हेही माहित नव्हतं. महाभारत बघून थोडाफार जे समजलं तेही "हि काहीतरी गुंतागुंत आहे संस्कृत मधली" असं वाटायचं. पण सरांची मुलगी आणि मी एकाच वर्गात, तेव्हा एकमेकींच्या नादाने शिकू, बोलणं, उच्चार स्पष्ट होतील असं विचार आईने आणि सरांनी केला आणि नाखुशीने मी शिकायला सुरुवात केली. पण मग मात्र गोडी वाढत गेली. ३ वर्षात ५ आणि मग ८ वीत संपूर्ण संस्कृत घेऊन केवळ आवड म्हणून उरलेले १३ अध्याय संथा घेऊन शिकून झाले. बाबांनी गीतेवर लिहिलेली टिपणांची वही मिळाली तेव्हा या सगळ्याचा सार्थक झालंय असं वाटलं.
वाचन सगळीकडून वाढत होतं. गौरी देशपांडे, सेतुमाधव पगडी...योगी अरविंद, विवेकानंद...संत चरित्र, क्रांतिकारकांच्या कथा, सुनिता देशपांडे, क्वचित कधी व पु काळे....
कुटुंब कथा, मासिकं, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, नाटक, सिनेमा, आत्मचरित्र.....लायब्ररीत जायचं, आणि निवांत हवं ते पुस्तक घेऊन यायचा. घरी आला कि जेऊन पुस्तक हातात घ्यायचा ते वाचून संपवायचं. हा झालं सुट्टीतला उद्योग. कॉलेज असला कि एखादा पुस्तक ८ दिवस पुरायचं. पण रात्री काहीतरी वेगळं वाचल्याशिवाय झोपायला जाववत नसे. एका बाजूला इन्जिनिअरिन्ग आणि दुसर्या बाजूला हे वाचन...गल्लत नाही केली कधी, पण धीम्या गतीने का असेना, पुस्तकांबारोबारचा प्रवास चालू ठेवला. शनी-रविवारच्या पुरवण्या होत्याच. त्यातून ओळख झाली अच्युत गोडबोले, मुकुंद टाकसाळे, मुकुंद संगोराम, राणी दुर्वे, शुभदा चौकर, आणि अनेक अभिनेत्यान्म्धल्या लेखकाची.

मी लहान असताना आई सांगायची, हे वाच, ते वाच, हे चांगला आहे...ते आवडेल तुला...आता मी सांगायला लागले. आई-बाबांशी बोलताना अनेक पुस्तकांचे संदर्भ आले कि त्यांना आजही बरं वाटतं.

पुस्तकांनी मला काय दिलं ते सांगता नाही येणार. मला काय येतं, काय माहिती आहे, मी किती वाचलंय...याचा हा लेखाजोखा नाही. अजून खूप काही वाचायचं आहे. एकाच वेळी अनेक विचारांचा कल्लोळ झाला कि धड काहीच नाही सांगता येत तसं झालं आज. खूप सांगायचं राहिलंय...पण मनात कुठेतरी खूप समाधान आहे. योग्य पुस्तकंची सांगत मला मिळाली याचं, आणि हे सगळं मला देणारे आई-बाबा लाभले याचं!

Friday, July 23, 2010

सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...


थंडीचा कडाका जरा कमी होईल अशा विचारात असतानाच एकदा मी खिडकीतून बाहेर बघत होते. माझा हा फार आवडीचा उद्योग झालाय आता. समोर दूरवर एम्पायर स्टेट ची बिल्डींग दिसते.... सगळा मॅनहॅटन व्ह्यू....वेळ कसा जातो कळत नाही!
....तर असाच बघत असताना खाली स्विमिंग पूल कडे नजर गेली. पूल ची साफ-सफाई चालू झाली होती. म्हणजे आता तो सुरु होणार तर...असा विचार मनात येऊन गेला. समर ची तयारी...त्या आधी स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतू! आणि एकदम नजर शेजारच्या झाडांकडे गेली. बघते तर काय!! इवली इवली पोपटी पानं वार्यावर झुलत होती!! कालपर्यंत जिथे नुसत्याच फांद्या दिसत होत्या तिथे आज चक्क पालवी फुटली होती! वसंत ऋतू, पालवी या गोष्टींचा इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. मी थोड्या वेळाने खाली गेले आणि समोरच्या बिल्डींग कडे पाहिलं, तर तिथे चेरी ब्लॉसम चं झाड फुलांनी भरून गेला होता. नाजूक फिक्कट गुलाबी फुलं! निसर्ग कात टाकतो म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष बघत होते, नव्हे, जगत होते! हा ऋत सगळ्यांना एवढं वेड का लावतो ते उमजायला लागलं होता हळू हळू. आणि मग हा रोजचाच खेळ झाला. खिडकीतून बघायचं, झाडाची पानं थोडी जास्त हिरवी दिसतात का....अजून कोणत्या झाडांना फुलं आलीयेत...कोणते रंग आहेत...
हवा जसजशी बदलत होती तशी ही रंगांची उधळण पण छटा बदलून खुणावत होती. त्यात मला सरप्राइज म्हणून विश्राम ने वॉशिंन्ग्टन डीसी ची ट्रीप काढली. तिथे या वेळी चेरी ब्लॉसम पूर्ण बहरला असणार होता. तिथे गेलो तेव्हा किती पाहू नि किती नको असं झालं होतं. खूप फोटो काढले. इतके, कि मेमरी कार्ड संपलं! त्या ट्रीप बद्दल पुन्हा कधीतरी लिहीन....
मी हवेतला हा बदल अनुभवत होते. खूप वारा, मधेच पाऊस, पराग कणांमुळे येणाऱ्या अलार्जीज, सर्दी....या काळात लोकांना हा त्रास खूप होतो. पोलन रेट म्हणजे पराग कण हवेत पसरण्याचा रेट सुद्धा हवामान अंदाजात दिलेला असायचा. सकाळी उठून पाहिलं कि पार्किंग मधल्या गाड्यांवर परागांचा हलकासा पिवळसर थर दिसे. डोळे लाल होणं, शिंका येणं, पोलन स्पेशल सर्दी :) असं काय काय नवीन नवीन कळत होतं. हळू हळू हवेतला उष्मा वाढायला लागला होता. ४ ला मावळणारा दिवस ६-७ पर्यंत पुढे गेला होता. "अजून थोडं थांब, ८ वाजता पण उजेड बघशील.." असं मैत्रिणी सांगायच्या. मला सगळ्याचं अप्रूप वाटत होतं. कितीही मोठं झालं तरी माणसातल लहान मूल कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही..तसंच माझं झालं होतं.
आणि खरंच एक दिवस आम्ही बाहेरून आलो तेव्हा रात्रीचे ८ वाजले आहेत हे केवळ घड्याळाकडे बघून कबूल करावं लागत होतं. मस्त उजेड होता बाहेर!! लोक आरामात फिरत होते, आईस क्रीम खात होते, खरेदी करत होते..
समर चालू झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जागोजागी समर सेल्स लागले होते. खरेदीची दुकानं भरून गेली होती. समर स्पेशल कपडे, खाद्यपदार्थ, आणि बरंच काय काय.....बगीचे उघडले होते, वेळा बदलून रात्री ८ पर्यंत केल्या होत्या. आमच्या सोसायटीचा बगीचा पण फुलांनी आणि मुलांनी भरून गेला! मग खूप भारतीय लोक तिथे दिसू लागले. ओळख नसतानाही ओळखीचं हसू लागले. असं बाहेरच्या देशात आल्यावर मग किंमत कळते कधी कधी.
माझ्या मनात विचार चालू झाले. (ही पण एक सवय इथे येऊन वाढली आहे. दिवसभर एकटीच असल्यामुळे आपुला संवाद आपल्याशी असं चालू असतं. मन म्हणजे लायब्ररी झाली आहे. वाट्टेल त्या विषयावरचं पुस्तक चालू असतं)
स्प्रिंग-वसंत म्हणजे अवखळ बाल्य जणू! खट्याळ....नाजूक आणि हवाहवासा वाटणारा. लहान बाळासारखा अल्लड. मनस्वी. हवापण तशीच. कधी सोसाट्याचा वारा, कधी पावसाच्या धारा...आकाशात रंगांचा गालीचा पसरलेला. एखाद्या चित्रकाराने कसल्यातरी विलक्षण आवेगाने कुंचल्याचे फटकारे मारावेत तसे मावळतीचे आणि उगवतीचे रंग....परागांचा पिवळसर शेला.
साधारण मार्च महिन्यात हि वसंताची चाहूल लागते...म्हणजे वर्षाचा तिसरा महिना..जणू सृष्टीलाच तिसरा महिना असावा....सगळी हवा अशी कि 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ सुंदर मोहकतेने' आपल्या साद घालते आहे असं वाटावं....

आणि मग येणारा समर...तारुण्याचा जल्लोष...उत्साहाचा मूर्तिमंत झरा!! सकाळी ६ ला उजाडणारा दिवस रात्री ८ ला मावळणार! आपल्या आयुष्यातला जसा तारुण्याचा काळ सगळ्यात मोठा तसाच हा समर सुद्धा. कर्तृत्वाची साक्ष मिरवणारा.
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत....उठा, जागे व्हा, चांगल्या कामाचा आशीर्वाद मिळावा असं सांगणारा...खूप काम करा, आयुष्याचा आनंद घ्या, भरपूर फिरा, खूप बघा, ऐका, अनुभवा.....जगा!

आणि मग येतो तो हेमंत...हेमंत म्हणजे 'हेम आहे अंती ज्याच्या असा तो' हा बहुव्रीही समास काय तो सोडवलेला शाळेत असताना...पण झाडांच्या शेंड्यांवर खरंच सोनं उधळव तसा हेमंत पाहायला मिळतो तो इथेच. खरं तर इथे या ऋतूला फॉल म्हणजे पानगळीचा ऋतू म्हणतात..म्हणजे आपला शिशिर ऋतू...ते काहीही असो...ती रंगांची शोभा बघावी ती इथेच. पिवळा, गुलाबी, क्वचित निळा सुद्धा रंग असतो पानांना. आता थोडे दिवसांनी मलाही बघायला मिळेल. मी बघितलाय ते फक्त विश्राम ने काढलेल्या फोटो मधून. आता या वेळी मला प्रत्यक्ष बघायला मिळेल.

आणि पानगळ झाली कि मात्र सगळं भकास होऊन जाईल...पर्णहीन झाड...पक्षी नसलेले बगीचे..आणि मुलं आणि फुलं नसलेली पार्क्स...पुन्हा एकदा ४ वाजताच होणारा अंधार...आणि त्या अंधारात हरवून जाणारी मायानगरी अमेरिका!!

शतकानुशतकं हे ऋतुचक्र चालू आहे, चालू राहणार आहे......आपल्या आयुष्यासारखाच. बाल्य, तारुण्य, हेमंतासारखा परिपक्व नितांत सुंदर असा उतरवायचा काळ, आणि मग सन्यस्त वृत्ती दाखवणारा हिवाळा...विरागी....पांढरा शुभ्र. हिमालयाच्या पावित्र्याची आठवण करून देणारा.
तसा पाहिलं तर एक भौगोलिक सत्य, पण नीट विचार केला, तर हेच ऋतुचक्र आपल्याला जगण्याची कला शिकवून जातं!!

Thursday, July 22, 2010

पोकोनोज ट्रिप

अमेरिकेमध्ये प्रत्येक ऋतू वेगळा असा अनुभवायला मिळतो. मी इथे जेव्हा आले तेव्हा थंडीचा कडाका होता. खूप बर्फ...खूप थंडी... -१५ वगैरे असायचं तापमान.
पण त्यातसुद्धा मजा होती. खरंतर बाहेर जायचं म्हणजे कंटाळवाणा प्रकार वाटे. थर्मल वेअर घालायचे, मग जीन्स वगैरे, मग स्वेटर, हातमोजे, पायमोजे, वरून ओवरकोट....इतका सगळा सरंजाम घालेपर्यंत बाहेर जायचा उत्साह मावळून जायचा.
मी जेव्हा पहिल्यांदा स्नो बघितला तेव्हा वेड लागायचं बाकी होतं. इतका बर्फ मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होते. घरात बसून खिडकीतून फोटो वगैरे काढून घेतले खूप. मग आम्ही कुठे बाहेर गेलो कि (लक्षात राहिला तेवढ्या वेळी!) फोटो काढले.
त्या सीझन मध्ये काढलेले सगळे फोटो एस्कीमोन्सारखे आले आहेत. किंवा अंतरालाविरांसारखे.
पण मग बाहेर गेलं कि आवडायचा. मुद्दाम थंडीत जायचे पण काही स्पॉट्स होते. आम्ही गेलो होतो एका ठिकाणी. पोकोनोज माऊंटन्सला, स्कीईंग करण्यासाठी. खरं तर पहाटेच निघायचं म्हणून आदल्या रात्री शिरा आणि पहाटे लवकर उठून भरपूर खिचडी करून ठेवली होती मी. पण उठायच्या नाही तरी निघायच्या हिशोबात आमची पहाट अंमळ उशिरा झाली, आणि सकाळी ९:१५ ला आम्ही निघालो.
बर्फावर स्कीईंग करणं हा एक छान अनुभव आहे. (फक्त हे समजायला ७-८ वेळा पडून, कंबर वगैरे शेकून घ्यावी लागली, आणि इतका करून धड नाहीच जमलं मला!!)विश्रामला खूप मस्त जमलं स्कीईंग. बर्फावर स्केटिंग करायलाही येतं त्याला, त्यामुळे स्कीईंग मधली मजा पण त्याला घेता आली. नव्याने स्कीईंग करणाऱ्यांसाठी एक ट्रेनिंग सेशन होतं. ते आम्ही केलं आणि मग स्वत: करायला गेलो. खरं तर त्या सेशन च्या शेवटी मी जोरात आपटले बर्फावर (बहुतेक ८ व्यांदा), तेव्हा पायात गोळा आला. मला चालणं पण जमेनासं झालं आणि एकूण सगळं बघता हीच माझी पंढरी म्हणून मी खालीच थांबले. विश्राम आणि त्याचे मित्र हिल्स वर जाऊन स्कीईंग करत येणार होते, मग मी कॅमेरा घेऊन फोटो काढायला घेतले. पण एकूण ट्रीप छान झाली. त्या वेळी ४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होत असे. मला एक तर असल्या थंडीची सवय नव्हती, त्यात भोवती सगळीकडे नुसताच बर्फ, हातमोजे घातले होते तेही पूर्ण लोकरीचे. बर्फात चालतील असे हातमोजे घालायला विसरलो होतो आम्ही. त्यामुळे हात अधिकच गार पडले होते. शेवटी ५ वाजून गेले, तिन्हीसांजा मिळाल्या आणि मी विश्राम ला सांगितलं की आता जाऊया परत नाहीतर माझा इथे पुतळा होईल. मग सगळे निघालो. मला कॅमेरा धरतासुद्धा येत नव्हता इतके हात गोठले होते. मग बेसिन शोधून, तिथे कडकडीत गरम पाण्याखाली हात धरले आणि हाय!!! सुया टोचाव्यात तशा झिणझिण्या आल्या हाताला! पण २ मिनिटात आपले हात हलू शकतायत ही सुखद जाणीव झाली, आणि आम्ही निघालो. याच्या मित्राने गाडी आणली होती, त्यात बसलो. त्यानंतर सगळ्यात छान जर काही झालं असेल तर ते हे, की पिशवीतून मी साबुदाण्याची खिचडी आणि गोड शिरा काढला आणि आम्ही ५ मिनिटात सगळं संपवून टाकलं! दिवसभर काहीही न खाता नुसती मस्ती केली होती बर्फात. आणि थोडसं अन्न पोटात गेल्यावर भुकेची जाणीव जास्त झाली. मग हायवे वर एका ठिकाणी थांबून खूप गरम कॉफी आणि खाणं खाल्लं. परत एकदा माझ्या हाताला सुया टोचून घेतल्या. इलाजच नव्हता. रात्री ८ ला घरी आलो आणि पुन्हा एकदा गर्रम गर्रम पाण्याने अंघोळ केली. मग मात्र रजई घेऊन जी झोपले ती सकाळी ९ ला उठले होते!! त्या वेळी जाणवलं कि बात जितनी सिधी लागती है उतनी है नाही!! हात पाय हलतायत ही जमेची बाजू होती, पण बाकी काम करताना पाय दुखत होताच. आपण वन पीस आलोय हाच काय तो आनंद!
अशीच थंडीची मजा घेत होते मी, आणि मग वसंत येणार....असा एकूण उत्साहाचं वातावरण दिसायला लागल आणि मी खुश झाले. एका नव्या ऋतुच स्वागत करायला मीही उत्सुक होतेच!

Monday, March 8, 2010

खेळ

परदेशी आल्यावर लॅपटॉप बंद झाला कि काय होतं याचा अनुभव घेऊन झाला!
झालं काय, एका छान दुपारी सिनेमा बघत जेवावं असा विचार करून मी नेट वर सिनेमा शोधण्यासाठी काही गुगलिंग करत होते आणि एका लिंक वर क्लिक केल्यावर विषाणूंनी माझ्या लॅपटॉप वर धाडघातली. मग काही केल्या तो नीट चालेना! आणि बाकी काही काम नाही, अभ्यास करायचा तर तेही मतेरीअल त्यात सेव्ह केलेलं..मला वेड लागल्यात जमा होतं..
तशात माझ्या एका मैत्रिणीने-काजल ने विचारलं बाहेर येतेस का म्हणून. मी लग्गेच तयार झाले! नाहीतर करणार काय होते मी तरी घरात बसून!!
न्यू योर्क मध्ये तिला एका खेळण्यांच्या दुकानात जायचं होतं. संध्याकाळी तिला एका वाढदिवसाला जायचं होतं, त्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. काहीतरी खेळ आणायचा म्हणून निघालो आम्ही.

३ मजली दुकान पाहून मी तर हरखूनच गेले! मला तिने सांगितला, कि १ वर्षाच्या मुलासाठी काही चांगला वाटलं कि सांग. आणि मी तसं शोधायला सुरुवात केली.
आम्ही गेल्यागेल्याच एका हसर्या बाई नी आम्हाला ताब्यात घेतला. "Good Morning madam!! How are you today!!" जन्मोजन्मीची ओळख असावी तशी तिने सुरुवात केली.
मीपण हसून " I am fine..thanks. how are you? (तशी मी रोजच छान असते! डॉक्टर ने पेशंट ला विचारावं तसं ही मला "आज" कशी आहे मी हे का विचारतेय मला कळेना! असेल इथला शिष्टाचार म्हणून मी सोडून दिलं!) असा प्रतिसाद दिलं. माफक ओळख होऊन माझ्या नावाची चिरफाड झाल्यावर मला काय हवंय हे तिने विचारलं. "something for 1 year baby boy for his first birthday.." माझा ऐकून ती माझंच अभिनंदन करायला लागली! तिने काय समज करून घेतला हे मला कळलं, पण सुदैवाने काजल मदतीला आली आणि तिने आम्हाला "गिफ्ट" घ्यायचा आहे याचा खुलासा केला! हुश्श्श! मग त्या हसर्या बाईनी हलत झुलत आम्हाला वेगवेगळी खेळणी दाखवली. आम्हीपण हसत होतो..
"you know , this toy is too good for baby.." असा करत एक खेळणं त्या बाईनी हातात घेतलं आणि वाक्यातल्या प्रत्येक शब्दाबरोबर दोन्ही हात हलवत, पुन्हा पुन्हा हसत ती त्यातल्या गमती सांगायला लागली. हे असा प्रत्येक खेळण्याबरोबर व्हायला लागल्यावर आम्ही दोघी कंटाळलो..पण नशिबाने कोणीतरी नवीन कुटुंब आपल्या पिल्लांना घेऊन आलं आणि या बाई तिकडे गेल्या. मग आम्ही निवांतपणे दुकानात फिरून आम्हाला हवं ते बघायला सुरुवात केली.

लहान मुलांसाठी असलेले टिफिन, त्यावरची रंगीत चित्रं, बटन दाबलं कि गाणी म्हणणाऱ्या ए बी सी डी च्या बसेस, soft toys नी भरलेल्या शेल्फ, ए बी सी डी शिकवणारी रंगीत पुस्तकं, १, २, ३, ४....अंकांच्या दुनियेशी ओळख करून देणारे खेळ, गाणार्या बाहुल्या, सेल वर चालणारी माकडे आणि बाकीचे प्राणी, खूप प्रकारचे कपडे..त्यातही मुलांचे ते निळे आणि मुलींचे ते गुलाबी..छोटे छोटे मोजे, लोकरीचे स्वेटर, मउ मऊ उशा आणि गाद्या, चिमुकले रग.. आणि या सगळ्या गोड वातावरणाशी स्पर्धा करणारी त्या दुकानातली चालती बोलती खेळणी...

.....मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं..मी परत त्या कामात गुंतले. काय घ्यावा आम्हाला कळत नव्हतं. मी म्हटलं, बघूया, चिनू आणि स्वरांगी, माझ्या २ भाच्यान्साठी खेळ घेतले होते ते २ अनुभव कामाला येतात का! एक मस्त कार दिसली आम्हाला, म्हटलं, नाहीतरी मुलासाठी घ्यायचं, तर कार छान वाटेल..पण ती फारच छोटी वाटली. मग मोठी पहिली तर खूप महाग होती. मग आम्ही आमचा मोर्चा बोलणाऱ्या खेळांकडे वळवला. पण त्यात बाहुल्या जास्त. मग ते रद्द केलं. छोटा लंच सेट आवडला होतं, पण तो तर आई-बाबांनी घेतला असणारच, मग तो नको म्हणून तोही परत ठेवला. मग एकात एक अडकवून ब्लॉक्स च्या रचना करायच्या ते पाहिलं, पण ते ३+ साठी होतं. खेळ आवडला तर वय जुळत नव्हतं, आणि वय जुळलं तर बजेट खूप वाढत होतं. त्यात पुन्हा मुलासाठी घ्यायचं, म्हणजे बाहुली वगैरे विचार बाद झाले होते आधीच! (बाहुल्या फक्त मुलींसाठी असतात असा काही नियम वगैरे आहे कि काय हि शंका मी खूप वर्षं मनातच ठेवली आहे! )
पण त्या बाहुल्या बघून मला माझा बाहुल्यांचा खेळ आठवला. माझ्याकडे १२ बाहुल्या होत्या! एकीचे कान गेलेले, एकीचं नाक नाही, एकीच्या फ्रॉक चा रंग गेलेला, एकीचे केस वेणीतून सोडवून जास्त गुंतवलेले..आईने हात टेकले होते! आणि त्या बाहुल्यांची नावंही होतीच. सगळी नाही आठवत आता, पण एकीच नाव होतं शुभा. आणि या नावाने मला माझी शेजारची एक ताई हाक मारायची! मी सारखं त्या शुभीला कडेवर घेऊन फिरायचे म्हणे! पण बाहुल्या खरच खूप गोड असतात...
त्या दुकानातल्या बाहुलीचा बोट धरून मी माझ्या लहानपणात पूर्ण हरवले! बाहुला-बाहुलीचा लग्न म्हणजे मजा असायची. आम्ही मैत्रिणीकडे जाऊन सगळा खेळ खेळायचो. माझी तर भातुकली पण मस्त होती. किचन सेट, फ्रीज, आत्ते बहिणीकडून उचलून आणलेली बुडकुली, माझी हौस बघून आज्जीने आणलेला टी सेट....काय काय होतं गोळा करून ठेवलेलं! कधी उन्हाळ्यातल्या दुपारी आमच्याच घराच्या मधल्या माडीच्या बुटक्या खोपटात खेळ रंगायचा. सगळी भातुकली लाऊन झाली कि रात्री झोपाण्यापासून सुरुवात व्हायची. संसार लाऊन आम्ही दमून जायचो न दोघी पण!! मग मी सकाळ सुरु झाली कि टिपिकल काम करायचे...म्हणजे घरातला थोडासा आवरून, गूळ-शेंगदाण्यांचा डबा घेऊन शाळेत जायचं. शाळेतल्या बाई म्हणून हं! आणि मग तिथे (नसलेल्या) मुलांना कविता आणि गणित शिकवायचं. आमचा हा खेळ माझ्या मोठ्या बहिणी हळूच बघायच्या आणि माझ्या लक्षात आलं की मी रडायला लागायची. "आआईईइ....बघ न ताया मला त्रास देतात..." म्हणून सूर लावला कि खेळ संपायचा!

------आठवणींचा खेळ काही मनातून संपत नव्हता आणि मनासारखा खेळ मिळत नव्हता. असंच फिरत होतो, आणि एक प्ले मॅट दिसलं. काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून मी जाऊन बघितलं. मुलांना खेळण्यासाठी म्हणून छान छान रंगीत चित्र असलेली चटई....माझं अस्खलित मराठीतलं भाषांतर! काहीही असो..चटई मस्त दिसत होती. मी काजल ला हाक मारून ते दाखवलं तर तिलाही आवडला. नीट बघितलं तेव्हा समजलं की त्याची टॉयबॅग सुद्धा करता येते. मग आम्ही त्याचे फोल्ड्स बघायला लागलो. मग आम्हाला त्या मगाशी भेटलेल्या हसर्या बाई पुन्हा भेटल्या. या वेळीही त्यानी हसून हलत बोलत आमचा स्वागत केला. मला कळेना, माफक हसताना किंवा हाय-हेलो करताना एवढा हलायचा कशाला! तर....आम्ही त्या चटई ची टॉयबॅग कशी करायची ते विचारला. मॅनेजर ला विचारून येते असं सांगून आम्हाला पुन्हा तसंच सोडून त्या गेल्या.
५ मिनिटात त्या खुशीत (आणि जरा जास्तच हलत) आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, "yes ladies.....here it is." त्यांच्या हातात फोल्ड्स कसे करायचे याचं चित्र असलेला कागद होता. आम्ही त्यानुसार फोल्ड्स करायला लागलो. मग एकदा विरुद्ध बाजूने, एकदा एक चूक आणि एक बरोबर असे, मग दोन्ही बाजू बरोबर पण फोल्ड्स ची दिशा चुकीची, अशी सगळी टोकं जुळवून बघितली. आजूबाजूच्या ४ लोकांनी पण आमचा हा खेळ-कम-अभ्यास बघितलं असावा...त्यांची पण करमणूक होत होती. जमत नाही बहुतेक असं वाटून आम्ही ती चटई न घेण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. हो न, १ वर्षाच्या चिमुकल्यासाठी काही घ्यायचं तर त्यासाठी इतका वेळ "अभ्यास" करावा लागला तर कसा चालेल! म्हणजे आधी त्याच्या आई-बाबांना ती घडी घालायला शिकवायला हवं! पण मग त्यातली एक घडी समजली आणि सगळा उलगडा झाला! मग मात्र चटकन जमली ती घडी आणि आम्ही चटई फिक्स केली. आता आम्हाला दुसरा पीस हवा होता. मग मी त्या शेल्फ जवळ गेले आणि बघते तर काय...एकच चटई उरली होती! मी ती चटकन उचलली आणि हुश्श केला. म्हणजे आमचा अभ्यास बघून उरलेल्या चटया लोकांनी घेऊन टाकल्या होत्या!! जय हो!!!

खेळ तर घेऊन झाला. पण दुकानातून पाय निघेना. शिवाय अजून बाकीचे मजले बघायचे होतेच. मग आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेरच्या शेल्फ वर फर चे ससे होते, पण अगदीच मरतुकडे!! म्हणजे गुबगुबीत ससुला म्हणावा तर हे अगदीच उलट दिसत होते. असंच फिरत सगळ्यात वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक मोठा पियानो होता. तो पायांनी वाजवायचा. म्हणजे त्या काळ्या-पांढर्या बटनावर पाय ठेवला कि सा-रे-ग-म वाजतं. मग मी आणि काजल ने थोडे सूर काढले त्यातून. तिथे एक चिमुरडा मनसोक्त नाचत होता आणि मला त्याचा खूप हेवा वाटला!! पण आनंदही तेवढाच झाला...

खूप वेळ झाला होता आम्हाला. गिफ्ट सुद्धा घेऊन झालं होतं. घरी जायला तासभर सहज लागणार होतं, आणि भूक पण लागली होती...आम्ही बिलिंग वगैरे झाल्यावर तिथून निघालो आणि घराच्या रस्त्याला लागलो.

काजलमुळे मला माझं लहानपण पुन्हा एकदा आठवलं. माझ्या बाहुल्या..भातुकली..
खर्या संसारात जरी रमले असले तरी जुनी भातुकलीतली बुडकुली आठवली. त्या दुकानात चिनू आणि स्वरांगीसाठी पुन्हा जायचं, तेही विश्राम ला घेऊन..असं मनाशी नक्की करून झालं!
मन छोट्या भातुकलीतून मोठ्या, स्वतःच्या संसारात आलं....

Friday, February 26, 2010

गोष्टी सोप्या असतात!

मला वाटलं होतं, की जगावर राज्य करणार्या देशातले लोक खूप खूपच हुशार असतील! संपूर्ण जगाच्या आर्थिक नाड्या हातात असलेला, आणि अरब देशातल्या तेलाच्या साठ्यावर डोळा ठेवणारा, राक्षसी महत्वाकांक्षा असणारा देश...(हुश्श!! मनातलं खरं ते हे असं बाहेर आलं) तिथले लोकसुद्धा तसेह्क असणार! ( आता 'तसेच' म्हणजे कसे हे ज्याचं त्याने ठरवावं)

तर झालं काय, मी इथल्या गॅस आणि वीज बिलाच्या ऑफिसमध्ये गेले होते. विश्राम ने नवीन घराचा पत्ता सबमिट केल्यावर जे पहिलं बिल आलं ते पाहून आमचे डोळे पांढरे झाले होते! वन रूम किचन च्या घराचं बिल आलं होतं $३१४!! मी जाऊन काय प्रकार आहे ते बघायचं ठरवलं.
सगळी कागदपत्रं घेऊन आम्ही (म्हणजे मीच...माझं स्वतःबद्दलचा आदर वाढलाय आता!) ऑफिसमध्ये गेलो. तिथे रीतसर टोकन घेऊन वाट बघत बसलो...आमचा नंबर कधी येईल याची. काही लोक आपसात गप्पा मारत होते...काही आयपॉडवर ऐकत होते..आम्ही मात्र एकदा हातातलं टोकन आणि एकदा काउंटरवर बघत होतो. यथावकाश आमचा नंबर आला. मनात जुळवलेल्या सगळ्या वाक्यांची उजळणी झाली. मनातच.
आम्ही आमचं बिल दाखवलं. खिडकीत बसलेल्या काकूंनी (हा त्यांच्याबद्दलचा आदर!) एकदा ते बिल आणि एकदा आम्ही यांना नीट पाहून विचारलं, 'Yes, what can i do for you?' मी त्यांना पत्ता वगैरे बदलल्याचं थोडक्यात सांगितलं. त्यानी अकौंट नंबर बघून रेकोर्ड चेक केलं आणि वाईट्ट चेहरा केलं!! आम्ही गार!! काय झालं असं विचारल्यावर समजलेली माहिती अशी- आमचं पत्ता नोव्हेंबर २००९ मध्ये बदलायचा अशी विनंती असून सुद्धा तिथल्या महाशयांनी तो नोव्हेंबर २०१० मध्ये बदलून टाकला!! आणि ही चूक आज लक्षात आली होती, मी बिल दाखवल्यावर. आता जो नोव्हेंबर २०१० उगवलाच नाही अजून, तिथे त्या पत्त्यावर बिल येणार कुठून? त्यावरही उत्तर मिळालं! विश्राम च्या जुन्या घराचं बिल, आणि बदल केलेला नवीन पत्ता असं मस्त घोळ झालं होता.आता या काकू ते दुरुस्त करणार होत्या आणि आम्ही २००९ मध्ये पत्ता बदलला आहे या नवीन माहितीच्या आधारावर जे बिल येईल ते आम्हाला पाठवणार होत्या. म्हणजे Nov, DEc, Jan
असं ३ महिन्याचं असेल असं समजलं. मग एकूण सगळा घोळ निस्तरला गेलाय याची खात्री झाली आणि आम्ही तिथून निघालो! (पुढच्या बिलाच काय हा नवीन प्रश्न मनात होताच).
घरी आल्यावर आम्ही इतिवृत्तांत कथन केला आणि पुन्हा एकदा जायला लागेल हे नक्की झालं

मग असाच एक शुभदिवस बघून आम्ही पुन्हा त्या ऑफिसमध्ये गेलो. टोकन घेतलं. खुर्चीत बसून आमच्या नंबरची वाट बघतानाच इतर लोकांच्या उद्योगांकडे लक्ष होतंच. मग
पुन्हा एकदा आमचा नंबर आला आणि आम्हाला वाटणारी भीती खरी झाली. भीती हि होती कि या वेळी 'त्याच' काकू असतील याची काय खात्री? कोणी काका असले किंवा दुसर्या काकू असल्या तर??? आणि तस्सच झालं!! दुसरे एक काका सुहास्य वदनाने आमचे स्वागत करते झाले.. मी थोडक्यात त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला. तो ऐकून घेऊन त्यानी काहीतरी टाईप केलं आणि ते चटकन खुर्चीतून उठले आणि कोपर्यात ठेवलेल्या छपाई यंत्राजवळ गेले. त्यांनी तिथून काही कागद आणले जे आमच्या नवीन बिलाचे होते!! माझा जीव भांड्यात पडला.
'This is your bill of 3 months. You will get it soon.' पण सून म्हणजे कधी ते कळेना. मी त्यावरची शेवटची तारीख बघितली आणि म्हटलं ४-५ दिवस तर उरले आहेत..तेव्हा त्यांनी पुरेसा वेळ मिळेल असं सांगितलं आणि मी पूर्ण शांत झाले.
खरं तर ही साधीच गोष्ट...तिथे जाऊन पत्त्यात बदल करून काम झालं असतं..मग एवढा लिहावंसं का वाटलं? एक छोटीशी चूक म्हणून २००९ च्या ऐवजी २०१० झालं त्याकडे दुर्लक्ष करून चाललं असतं. पण आपल्या मनात काही गोष्टी पक्क्या झालेल्या असतात. म्हणजे 'तिकडे' सगळा कसा परफेक्ट असतं...'ते' लोक फार चुका करत नाहीत...सगळा कसा कॉम्प्युटर वर असतं, मग चुका कशा होतील..

पण विसरायला होतं की इथेही माणसच राहतात. आणि जेव्हा असे छोटे छोटे अनुभव रोज येतात तेव्हा ते सांगावेसे वाटतात! मी रोज आमच्या बिल्डीन्ग्च्या तळ मजल्यावर जाऊन डाक पाहून येते. मेलरूम मध्ये गेलं कि समोर मेलरूम चा इन्चार्ज बसलेला दिसतो. एकदा आमच्या शेजारच्या बाईचं मेल आमच्या बॉक्स मध्ये चुकून आलं म्हणून मी त्याला सांगायला गेले ते पुरतं ऐकून न घेता त्याने मला बिल्डींग च्या ऑफिसमध्ये जायला सांगितलं. आमचा एक पार्सल आलं होतं (म्हणजे आमच्या घरमालाकासाठी पार्सल, या पत्त्यावर) ते मी त्याला सांगत होते तर बराच वेळ मी सांकेतिक भाषेत बोलत असल्यासारखा ऐकत होतं. माझं बोलून झाल्यावर म्हणाला, 'please speak up' आणि हे अप म्हणताना त्याने हात वर उचलून दाखवला मला!!!
गोष्टी खरच सोप्या असतात...पण मग त्या अशा गुंतागुंतीच्या का करतात लोक?

Tuesday, February 23, 2010

अजी सोनियाचा दिनू...

खूप दिवस मनात होतं की स्वतःचा ब्लॉग असावा...काहीतरी लिहावं..पण कसा कोण जाणे, मुहूर्त मिळत नव्हता!!
पण आज मनाशी ठाम ठरवलं, की काहीही झालं , तरी लिहायचं।
लिहायचं काय, हा प्रश्न होताच मनात...पण उत्तरसुद्धा मिळालं॥
इतके दिवस मनात जे नुसतच साठून राहिलं होतं ते लिहायचं। मनातली अडगळ इथे मोकळी करायची म्हणा न!

आत्ता बाहेर मस्त स्नो आहे..आणि मला झकासपैकी आइस्क्रीमचा गोळा खावासा वाटतोय!!
काय छान दिवस आहे!! सकाळचा नाश्ता झालाय, वेळ आहे आणि मी लिहितेय!! थोडसं विखुरल्यासारछं, पण कोणाशीतरी बोलल्यासारखं सुद्धा!
हम्म्म...जमतय म्हणायचं..