Monday, March 8, 2010

खेळ

परदेशी आल्यावर लॅपटॉप बंद झाला कि काय होतं याचा अनुभव घेऊन झाला!
झालं काय, एका छान दुपारी सिनेमा बघत जेवावं असा विचार करून मी नेट वर सिनेमा शोधण्यासाठी काही गुगलिंग करत होते आणि एका लिंक वर क्लिक केल्यावर विषाणूंनी माझ्या लॅपटॉप वर धाडघातली. मग काही केल्या तो नीट चालेना! आणि बाकी काही काम नाही, अभ्यास करायचा तर तेही मतेरीअल त्यात सेव्ह केलेलं..मला वेड लागल्यात जमा होतं..
तशात माझ्या एका मैत्रिणीने-काजल ने विचारलं बाहेर येतेस का म्हणून. मी लग्गेच तयार झाले! नाहीतर करणार काय होते मी तरी घरात बसून!!
न्यू योर्क मध्ये तिला एका खेळण्यांच्या दुकानात जायचं होतं. संध्याकाळी तिला एका वाढदिवसाला जायचं होतं, त्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. काहीतरी खेळ आणायचा म्हणून निघालो आम्ही.

३ मजली दुकान पाहून मी तर हरखूनच गेले! मला तिने सांगितला, कि १ वर्षाच्या मुलासाठी काही चांगला वाटलं कि सांग. आणि मी तसं शोधायला सुरुवात केली.
आम्ही गेल्यागेल्याच एका हसर्या बाई नी आम्हाला ताब्यात घेतला. "Good Morning madam!! How are you today!!" जन्मोजन्मीची ओळख असावी तशी तिने सुरुवात केली.
मीपण हसून " I am fine..thanks. how are you? (तशी मी रोजच छान असते! डॉक्टर ने पेशंट ला विचारावं तसं ही मला "आज" कशी आहे मी हे का विचारतेय मला कळेना! असेल इथला शिष्टाचार म्हणून मी सोडून दिलं!) असा प्रतिसाद दिलं. माफक ओळख होऊन माझ्या नावाची चिरफाड झाल्यावर मला काय हवंय हे तिने विचारलं. "something for 1 year baby boy for his first birthday.." माझा ऐकून ती माझंच अभिनंदन करायला लागली! तिने काय समज करून घेतला हे मला कळलं, पण सुदैवाने काजल मदतीला आली आणि तिने आम्हाला "गिफ्ट" घ्यायचा आहे याचा खुलासा केला! हुश्श्श! मग त्या हसर्या बाईनी हलत झुलत आम्हाला वेगवेगळी खेळणी दाखवली. आम्हीपण हसत होतो..
"you know , this toy is too good for baby.." असा करत एक खेळणं त्या बाईनी हातात घेतलं आणि वाक्यातल्या प्रत्येक शब्दाबरोबर दोन्ही हात हलवत, पुन्हा पुन्हा हसत ती त्यातल्या गमती सांगायला लागली. हे असा प्रत्येक खेळण्याबरोबर व्हायला लागल्यावर आम्ही दोघी कंटाळलो..पण नशिबाने कोणीतरी नवीन कुटुंब आपल्या पिल्लांना घेऊन आलं आणि या बाई तिकडे गेल्या. मग आम्ही निवांतपणे दुकानात फिरून आम्हाला हवं ते बघायला सुरुवात केली.

लहान मुलांसाठी असलेले टिफिन, त्यावरची रंगीत चित्रं, बटन दाबलं कि गाणी म्हणणाऱ्या ए बी सी डी च्या बसेस, soft toys नी भरलेल्या शेल्फ, ए बी सी डी शिकवणारी रंगीत पुस्तकं, १, २, ३, ४....अंकांच्या दुनियेशी ओळख करून देणारे खेळ, गाणार्या बाहुल्या, सेल वर चालणारी माकडे आणि बाकीचे प्राणी, खूप प्रकारचे कपडे..त्यातही मुलांचे ते निळे आणि मुलींचे ते गुलाबी..छोटे छोटे मोजे, लोकरीचे स्वेटर, मउ मऊ उशा आणि गाद्या, चिमुकले रग.. आणि या सगळ्या गोड वातावरणाशी स्पर्धा करणारी त्या दुकानातली चालती बोलती खेळणी...

.....मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं..मी परत त्या कामात गुंतले. काय घ्यावा आम्हाला कळत नव्हतं. मी म्हटलं, बघूया, चिनू आणि स्वरांगी, माझ्या २ भाच्यान्साठी खेळ घेतले होते ते २ अनुभव कामाला येतात का! एक मस्त कार दिसली आम्हाला, म्हटलं, नाहीतरी मुलासाठी घ्यायचं, तर कार छान वाटेल..पण ती फारच छोटी वाटली. मग मोठी पहिली तर खूप महाग होती. मग आम्ही आमचा मोर्चा बोलणाऱ्या खेळांकडे वळवला. पण त्यात बाहुल्या जास्त. मग ते रद्द केलं. छोटा लंच सेट आवडला होतं, पण तो तर आई-बाबांनी घेतला असणारच, मग तो नको म्हणून तोही परत ठेवला. मग एकात एक अडकवून ब्लॉक्स च्या रचना करायच्या ते पाहिलं, पण ते ३+ साठी होतं. खेळ आवडला तर वय जुळत नव्हतं, आणि वय जुळलं तर बजेट खूप वाढत होतं. त्यात पुन्हा मुलासाठी घ्यायचं, म्हणजे बाहुली वगैरे विचार बाद झाले होते आधीच! (बाहुल्या फक्त मुलींसाठी असतात असा काही नियम वगैरे आहे कि काय हि शंका मी खूप वर्षं मनातच ठेवली आहे! )
पण त्या बाहुल्या बघून मला माझा बाहुल्यांचा खेळ आठवला. माझ्याकडे १२ बाहुल्या होत्या! एकीचे कान गेलेले, एकीचं नाक नाही, एकीच्या फ्रॉक चा रंग गेलेला, एकीचे केस वेणीतून सोडवून जास्त गुंतवलेले..आईने हात टेकले होते! आणि त्या बाहुल्यांची नावंही होतीच. सगळी नाही आठवत आता, पण एकीच नाव होतं शुभा. आणि या नावाने मला माझी शेजारची एक ताई हाक मारायची! मी सारखं त्या शुभीला कडेवर घेऊन फिरायचे म्हणे! पण बाहुल्या खरच खूप गोड असतात...
त्या दुकानातल्या बाहुलीचा बोट धरून मी माझ्या लहानपणात पूर्ण हरवले! बाहुला-बाहुलीचा लग्न म्हणजे मजा असायची. आम्ही मैत्रिणीकडे जाऊन सगळा खेळ खेळायचो. माझी तर भातुकली पण मस्त होती. किचन सेट, फ्रीज, आत्ते बहिणीकडून उचलून आणलेली बुडकुली, माझी हौस बघून आज्जीने आणलेला टी सेट....काय काय होतं गोळा करून ठेवलेलं! कधी उन्हाळ्यातल्या दुपारी आमच्याच घराच्या मधल्या माडीच्या बुटक्या खोपटात खेळ रंगायचा. सगळी भातुकली लाऊन झाली कि रात्री झोपाण्यापासून सुरुवात व्हायची. संसार लाऊन आम्ही दमून जायचो न दोघी पण!! मग मी सकाळ सुरु झाली कि टिपिकल काम करायचे...म्हणजे घरातला थोडासा आवरून, गूळ-शेंगदाण्यांचा डबा घेऊन शाळेत जायचं. शाळेतल्या बाई म्हणून हं! आणि मग तिथे (नसलेल्या) मुलांना कविता आणि गणित शिकवायचं. आमचा हा खेळ माझ्या मोठ्या बहिणी हळूच बघायच्या आणि माझ्या लक्षात आलं की मी रडायला लागायची. "आआईईइ....बघ न ताया मला त्रास देतात..." म्हणून सूर लावला कि खेळ संपायचा!

------आठवणींचा खेळ काही मनातून संपत नव्हता आणि मनासारखा खेळ मिळत नव्हता. असंच फिरत होतो, आणि एक प्ले मॅट दिसलं. काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून मी जाऊन बघितलं. मुलांना खेळण्यासाठी म्हणून छान छान रंगीत चित्र असलेली चटई....माझं अस्खलित मराठीतलं भाषांतर! काहीही असो..चटई मस्त दिसत होती. मी काजल ला हाक मारून ते दाखवलं तर तिलाही आवडला. नीट बघितलं तेव्हा समजलं की त्याची टॉयबॅग सुद्धा करता येते. मग आम्ही त्याचे फोल्ड्स बघायला लागलो. मग आम्हाला त्या मगाशी भेटलेल्या हसर्या बाई पुन्हा भेटल्या. या वेळीही त्यानी हसून हलत बोलत आमचा स्वागत केला. मला कळेना, माफक हसताना किंवा हाय-हेलो करताना एवढा हलायचा कशाला! तर....आम्ही त्या चटई ची टॉयबॅग कशी करायची ते विचारला. मॅनेजर ला विचारून येते असं सांगून आम्हाला पुन्हा तसंच सोडून त्या गेल्या.
५ मिनिटात त्या खुशीत (आणि जरा जास्तच हलत) आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, "yes ladies.....here it is." त्यांच्या हातात फोल्ड्स कसे करायचे याचं चित्र असलेला कागद होता. आम्ही त्यानुसार फोल्ड्स करायला लागलो. मग एकदा विरुद्ध बाजूने, एकदा एक चूक आणि एक बरोबर असे, मग दोन्ही बाजू बरोबर पण फोल्ड्स ची दिशा चुकीची, अशी सगळी टोकं जुळवून बघितली. आजूबाजूच्या ४ लोकांनी पण आमचा हा खेळ-कम-अभ्यास बघितलं असावा...त्यांची पण करमणूक होत होती. जमत नाही बहुतेक असं वाटून आम्ही ती चटई न घेण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. हो न, १ वर्षाच्या चिमुकल्यासाठी काही घ्यायचं तर त्यासाठी इतका वेळ "अभ्यास" करावा लागला तर कसा चालेल! म्हणजे आधी त्याच्या आई-बाबांना ती घडी घालायला शिकवायला हवं! पण मग त्यातली एक घडी समजली आणि सगळा उलगडा झाला! मग मात्र चटकन जमली ती घडी आणि आम्ही चटई फिक्स केली. आता आम्हाला दुसरा पीस हवा होता. मग मी त्या शेल्फ जवळ गेले आणि बघते तर काय...एकच चटई उरली होती! मी ती चटकन उचलली आणि हुश्श केला. म्हणजे आमचा अभ्यास बघून उरलेल्या चटया लोकांनी घेऊन टाकल्या होत्या!! जय हो!!!

खेळ तर घेऊन झाला. पण दुकानातून पाय निघेना. शिवाय अजून बाकीचे मजले बघायचे होतेच. मग आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेरच्या शेल्फ वर फर चे ससे होते, पण अगदीच मरतुकडे!! म्हणजे गुबगुबीत ससुला म्हणावा तर हे अगदीच उलट दिसत होते. असंच फिरत सगळ्यात वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक मोठा पियानो होता. तो पायांनी वाजवायचा. म्हणजे त्या काळ्या-पांढर्या बटनावर पाय ठेवला कि सा-रे-ग-म वाजतं. मग मी आणि काजल ने थोडे सूर काढले त्यातून. तिथे एक चिमुरडा मनसोक्त नाचत होता आणि मला त्याचा खूप हेवा वाटला!! पण आनंदही तेवढाच झाला...

खूप वेळ झाला होता आम्हाला. गिफ्ट सुद्धा घेऊन झालं होतं. घरी जायला तासभर सहज लागणार होतं, आणि भूक पण लागली होती...आम्ही बिलिंग वगैरे झाल्यावर तिथून निघालो आणि घराच्या रस्त्याला लागलो.

काजलमुळे मला माझं लहानपण पुन्हा एकदा आठवलं. माझ्या बाहुल्या..भातुकली..
खर्या संसारात जरी रमले असले तरी जुनी भातुकलीतली बुडकुली आठवली. त्या दुकानात चिनू आणि स्वरांगीसाठी पुन्हा जायचं, तेही विश्राम ला घेऊन..असं मनाशी नक्की करून झालं!
मन छोट्या भातुकलीतून मोठ्या, स्वतःच्या संसारात आलं....

6 comments:

  1. अशीच छान छान लिहित राहा.

    ReplyDelete
  2. किती छान लिहितेस अगं!! ते दुकान, त्या बाई, ती खेळणी, पिआनो, छोटा मुलगा सर्वच्या सर्व तसच्या तसं पुन्हा माझ्या नजरेसमोर आलं. :)

    ReplyDelete
  3. mala marathi vaigere kahi lihita yet nahi.
    Ho pan khup chan lihilela aahes. Mala aavdale.
    Tumcha teddy visaralaa ka?

    ReplyDelete
  4. Awesome writing !!!!! keep it up:).

    ReplyDelete
  5. Tuza blog baghun chan vatala. lihit raha, mala vachayala aavadel.

    ReplyDelete