Friday, May 27, 2011

आनंदसोहळा
जेव्हा दीड वर्षापूर्वी अमेरिकेत आले तेव्हाच वजन कमी करायचा निर्णय घेतला. सोसायटीत जिमची सुविधापण होतीच. मेम्बर्शीप घेतली आणि जिम सुरु केलं. सुरुवातीला साधं चालणं नंतर हळूहळू वाढवलं. बरेचदा माझ्या जिमच्या वेळात जिम रिकामं असे. तिथे एक टेप रेकोर्डेर वगैरे होता, पण मी कधी लावला नाही तो. थोडे दिवसांनी मीही माझं आयपोड घेऊन जायला लागले. २० मिनिट चालणं आणि नंतर ५ मिनिट कुल डाउन टायमर होता माझ्या सेटिंग मध्ये. ती २५ मिनिटं मी गाणी ऐकत चालू लागले. आणि मग लक्षात आलं की इतकं लक्ष देऊन हल्ली ऐकलीच जात नाहीत गाणी! काम करताना जेव्हा ८०% लक्ष कामात असतं तेव्हा, घरात अगदीच शांत आणि एकटं वाटू नये म्हणूनच गाणी चालू असतात.

मग मात्र मी घरातून निघतानाच आज काय ऐकायचं हे ठरवून निघू लागले. पं. भीमसेन जोशींचे अभंग, हिंदी गाणी, मराठी गाणी, शास्त्रीय संगीत..यातलं काहीतरी निवडायचं आणि चालत असताना ते ऐकायचं. त्यात मग एक दिवस शोध लागला की माझ्या चालण्याचा वेग आणि ताल 'माझे माहेर पंढरी' शी जुळतोय!!! मी संपूर्ण २० मिनिटं तेच एक गाणं ऐकलं! मग कोणत्या अभंगाशी माझी चाल जुळते ते बघायचा नादच लागला. मग मी हिंदी गाण्यांकडे मोर्चा वळवला. 'बालमा खुली हवा में' हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं आणि वेड लागलं मला! मग मी त्याच तालात चालायला सुरुवात केली! :)

मग एकदा शास्त्रीय रागावर आधारित व्यायाम करायचा विचार आला मनात. मी केदार राग लावला. माझा आवडता राग. पण ठाय लयीतल्या त्या बंदिशीत मला चालायचा सूर गवसेना. शोधाशोध करताना बिहाग मिळाला. मालिनी राजुरकरान्चा. त्यातली बंदिश सुद्धा आवडली खूप. मग मी २० मिनिटं बिहाग ऐकायला सुरुवात केली. मग माझ्या मोबाइलमधला मारुबिहागही लावून बघितला. प्रभा अत्रेंची प्रसिद्ध बंदिश, जागू मी सारी रैना....ही तर माझ्या मर्मबंधातली बंदिश होती, आहे! आता मात्र जिमची सुरुवात केली तेव्हा कंटाळा येणारी २० मिनिटं मला कमी पडू लागली. शेवटचा ५ मिनिटांचा कुल डाऊन कसा सुरु होतो हे लक्षात येणार नाही इतकी मी रमले!
घाम गाळून वजन कमी केल्याच्या आनंदाबरोबर मला हा श्रवणाचा आनंद मिळू लागला. दिवसाचा सगळा वेळ जरी माझाच होता, तरी या वेळाची मी वाट बघायला लागले. दिवसभर एकटी असूनही या वेळाची मला जास्त किंमत वाटायला लागली.
अजून एक मजा म्हणजे मला आयपोड मध्ये भैरवी मिळाली. मी भैरवी खूप ऐकत नाही. कितीही ऐकली तरी मन सरावत नाही आणि डोळे ओलावतात. गाण्यातलं कळत नसूनही भैरवीतला तो कुठलासा कोमल सूर काळीज कापतो नेहेमी. मी भान विसरते भैरवी ऐकताना. जीव गुदमरतो. ही मैफिल संपली हे दु:ख खूप असतं. प्रवास संपला...आता? असं वेड्यासारखं वाटत रहातं. पण मालिनी राजूरकरांची ही भैरवी म्हणजे भैरेवी रागाची स्तुती आहे, तिचा गोडवा वर्णन केलाय...अगदी सार्थ गोडवा. 'भैरवी..प्रियदर्शनी..रागिणी..'

ही भैरवी मी योगायोगाने शेवटच्या ५ मिनिटात ऐकली आणि ठरवलं की हीच ऐकायची, आणि शेवटीच ऐकायची. व्यायाम संपल्याचं एक वेगळं समाधान मिळतं, त्या समाधानात ही भैरवी ऐकायची. आणि मग रुटीन ठरलं. २० मिनिटं बिहाग आणि ५ मिनिटं भैरवी. हे दोनही 'रिपीट' मोडवर ठेवायचं.
असं सुरु केल्यावर जो आनंद मिळायला लागला त्याला तोड नाही! इतके दिवस नुसता वजन कमी करायचं म्हणून होणार व्यायाम एक आनंदसोहळा कधी झाला माझं मलाही समजलं नाही. :)

3 comments:

 1. तुमचा ब्लॉग आज़ पहिल्यांदाच पाहिला, आणि ३-४ लेख वाचले. ते सगळेच आवडले.

  बंदिश आणि चीज़ यांत काय फरक आहे, असा उल्लेख तुम्ही काही महिन्यांपूर्वी केला आहे. तसा काहीच फरक नाही. पण माझ्या समज़ानुसार चीज़ेचे शब्द असतात, आणि हृदयनाथच्या सुन्दर व्याख्येनुसार ते शब्द सुरांत बन्दिस्त केले की झाली बन्दिश. पण एखादा वादक बिनशब्दांचीच बन्दिश बनवू शकतो आणि तिलाही शब्दांचा अभाव असूनही चीज़ म्हणूनच सम्बोधतात, आणि बन्दिश म्हणूनही सम्बोधतात. तर 'वागर्थाविव सम्पृक्तो' प्रमाणे कुठलीही चीज़ तिच्याशी निगडित सुरावटीतूनच ओळखली आणि आठवली ज़ाते, म्हणून ते दोन्ही शब्द एकमेकांऐवजी वापरता येतात. एकूणच आलापी म्हणजे नक्की काय, बढत म्हणजे नक्की काय याच्या अचूक व्याख्या नाहीत, आणि तशा व्याख्या असण्याची गरज़ही मला वाटत नाही.

  ReplyDelete
 2. धन्यवाद नानीवडेकरजी. मला खूप छान माहिती दिलीत. प्रतिक्रियेसाठी आभार. :)

  ReplyDelete
 3. छान लिहिलं आहे. खूप सुरेख, तुझ्या मनातलं अगदी जसंच्या तसं उतरल्यासारखं :)

  ReplyDelete