तसं माझ्या आजीचं माहेरचं नाव शांती, सासरचं सुमती. पण सुमती हे नाव फक्त कागदोपत्रीच होतं. सगळे शांतूताई/मावशी/आत्ते म्हणत. तिच्या भावंडात ती मोठी, सासरीही मोठी सूनच. सासरी कोणी तिला नाव घेऊन हाक मारलेली मल आठवत नाही. नुसतंच वहिनी/मामी/काकू म्हणत असावेत.
सासरी राजापुरात एकदा जावेशी भांडण झालं, आणि या दोघींचं जमणं कठीण, म्हणून आजोबा बदली घेऊन रत्नागिरीला आले ते कायमचेच. (दुर्दैवाने आजोबा खूप लवकर गेले. ते गेल्यावर वर्षभरात बाबांचं लग्न झाल्यामुळे आईनेही आजोबांना बघितलेलं नाही.)
आजीला शिक्षणाची खूप आवड होती. ती स्वतः चौथीच्या पुढे शिकू नाही शकली, पण तिने स्वतःच्या धाकट्या बहिणीला रत्नागिरीत आणून शिकवलं. पुढे मग तिची भाचरं, कोणी नात्यातली मुलं वगैरे रत्नागिरीत आले की तात्पुरती सोय म्हणून आमच्या घरी रहात, वसतिगृह मिळालं की तिकडे लागेल तीही मदत आजी करत असे. तिने तिच्या दोन्ही मुलींना आवडीचं शिक्षण घेऊ दिलं. पुढे त्या दोघींनीही नोकरी केली. बाबा म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा, पण लहान असतानाच बाबांना तिने शाखेत जायची सवय लावली आणि बाबा पुढे संघाचं काम करू लागले. एकच्या एक मुलगा असूनही कसं काय शाखेत पाठवलं....पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून बाबांनी लग्न न करायचा निर्णय घेतला असता तर...वगैरे प्रश्न लोक आजीला विचारत. पण आजी प्रखर देशभक्त होती. (आम्ही कधी कधी तिची चेष्टा करायचो. शिवाजीमहाराज, भगतसिंग, अटलबिहारी..................आणि मग फक्त माझे बाबा हेच काय ते ग्रेट राष्ट्रभक्त असं तिला वाटतं असं आम्हीच चिडवत असू तिला ). तिचं वाचन खूप होतं. ती कुटंबकथांत रमे, पण भगतसिंगांचं चरित्रही तिला पाठ होतं. लहानपणी ती आम्हाला शिवाजीराजांच्या आणि भगतसिंगांच्या गोष्टी सांगे.
एकदा मला आठवतंय, गोष्ट सांगताना दिलेरखानाचा उल्लेख होता. आजीला या दिलेरखानाची फार म्हणजे फारच चीड येई. "फितवलंन ना त्याने संभाजीराजाना!" हे त्याचं कारण! आणि मग पुढे तिची अवस्था पुलंच्या हरितात्यांसारखी झाली होती.
ज्या वेळी भाजपचं सरकार एका मताने पडलं होतं त्या वेळी, "मेल्यानो!! देशाचं भलं करतायत अटलजी, तर बघवेना तुम्हाला!" म्हणून विरोधकांवर चिडली होती. "बाबी गो, माझा जन्म १९२६ सालचा, आणि अटलजी १९२४ चे! आम्ही एकाच पिढीतले! म्हणून जास्त आदर वाटतो गो!" असं म्हणाली होती मला.
तशी धाडसी बाई होती ती. रत्नागिरीत आमचे जेवढे नातेवाईक होते त्यांच्याकडे तिची महिन्यातून एखादी तरी खेप होत असे. वरच्या आळीतून माळनाक्यावर चढण चढून चालत जाणे हे काय दिव्य आहे ते तिथे राहिलेल्यांना कळेल, पण आजीला काही नाही त्याचं! ती सरळ उठून चालू पडे आणि तिच्या भाच्या वगैरे असतील त्यांना भेटून येई. किती वेळा बाबा सांगत, मी सोडतो, किंवा बस ने जा....पण ती कोणावरही अवलंबून नाही राहिली. रत्नागिरी निदान माहितीतली तरी होती, पण दर मे महिन्यात ती मुंबईत गोरेगावला जात असे, तिच्या भावंडांकडे, आणि मग तिथून बोरिवलीला माझ्या आत्याकडे, आणि इतर ठिकाणच्या नातेवाईकांकडे चक्क लोकलनेही जायची.
आजी एकूणच खूप सोशल होती. घरातही हेच संस्कार होते. तिने घरात कधीही कोणतंही सोवळं पाळलं नाही. स्वतःच्या मुलींना बाजूला बसायला लावलं नाही, तसं सुनेलाही नाही. खरं म्हणजे माझी आई जरा जुन्या संस्कारात, कुटरे नावाच्या खेड्यात मोठी झालेली, तिला सोवळं नाही हेच पचनी पडायला वेळ लागला होता. पण आजीने तिला कसल्याही परंपरांमधे अडकवलं नाही. तिच्या शाळेतल्या सहशिक्षिकांबद्दलही आजीला कौतूक होतं. सून म्हणून टिपिकल सासुरवास तिने कधीच नाही केला आईला. नाही म्हणायला ती बाबांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होती. पण ते आम्हालाही जाणवायचं. घरात काही गोड-धोड केलं की, "बाबी गो...बाबास ठेव हो थोडं" म्हणायची. मग आम्हीही म्हणायचो, "आजी, अगं तुझा मुलगा आहे तो, पण आमचेही बाबाच ना! आम्हाला घास गोड लागेल का बाबांना नाही ठेवला तर!" आईला कधी कधी त्रास होत असे याचा. स्वयंपाकघरात आजीची सत्ता (हा तिचाच शब्द ) होती. पण एरवी आजी आम्हा तिघींना मायेने सांभाळे. आजी घरात असल्यामुळे आईला शाळेत जाताना कधी आमची काळजी नाही वाटली. तशी आम्हाला एक बाळगती बाई होती, पण आजीचंही लक्ष असे आमच्यावर. तसा आजीचा आईवर खूप विश्वास होता. बाबा संघाच्या कामासाठी फिरतीवर असत, पण आजीला आईचा आणि आईला आजीचा आधार वाटे. १९७५ साली जेव्हा आणीबाणी होती, तेव्हा बाबा १६ महिने राजकीय कैदी म्हणून तुरुंगात होते. त्या वेळी दोघींनी एकमेकींना जपलं.
आजीच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर असल्यामुळे खरंतर मला आजी जास्त आठवते ती वयामुळे विस्मरण वाढलेलीच. आयुष्याची शेवटची २ वर्षं ती बेडरिडन होती, अल्झायमर्स होऊन. पण त्याधीची ६-७ वर्षं टप्प्याटप्प्याने तिला हा आजार होतच होता. पण वयामुळे वाढणारं विस्मरण असेल या समजुतीत त्याचं गांभीर्य कळलं नाही.
माझे बाबा आणि आत्त्या एकाच शाळेत शिकवत. घराजवळ शाळा. मधल्या सुट्टीत चहा प्यायला दोघंही येत घरी. आजी चहा करे. एकदा तिने चहा गॅसवरून उतरवताना गॅस बंद केलाच नाही, शिवाय गावि (सांडशी/पक्कड याला कोकणांत काही ठिकाणी गावि म्हणतात) घेण्याऐवजी तिने पदराने पातेली उचलली. नेमकं आत्तेने हे बघितलं आणि पटकन जाऊन गॅस बंद केला. ही सुरुवात होती. आपण असं का केलं, गॅस बंद केलाच नाही वगैरे काहीही तिच्या लक्षात आलं नाही. पुढे हे प्रकार खूप वाढले. घरातून बाहेर पडून मागच्या आगरात गेली की यायचा रस्ता विसरायची. मग शेजारी जाऊन सांगायची, "मी रायकर सरांची आई. इकडे आगरात आले होते, आता घरी जायचा रस्ता विसरलेय. मला कसं जायचं ते सांगाल का?" आणि मग शेजारची काकू तिला घरी आणे. नशीब आमचं, की आपण कोण हे तिच्या लक्षात होतं.
पण नंतर ती खूप व्हायोलंट होऊ लागली. आणि आपण काय करतोय, का करतोय हेही तिला कळेनासं झालं. २० किलोचं मीठाच्या पिशव्यांच अख्खं पोतं तिला विहिरीत नेऊन टाकावंसं वाटलं. तिने ते उचललंही होतं!! बाबांनी वेळीच बघून तिला परत आणलं घरात. मुख्य दाराची कडी उघडता येत नाही म्हणून सरळ तिने ती कोयंड्यातून उचकटली होती. तिच्या या प्रकाराने आम्ही सगळे हबकलोच होतो. शेवटी मानसोपचारतज्ञांना भेटून हे सगळं सांगितलं. त्यांनीच हा आजार सांगितला. जेव्हा आपली सारासार विचार करायची मानसिक शक्ती संपते, तेव्हा त्याचं अफाट शारीरिक क्षमतेत रूपांतर होतं. एरवी आपण कधीच अवजड गोष्टी हातळू/उचलू शकत नाही कारण आपलं कॉन्शस मन आपल्याला ते करण्यापासून अडवतं. पण या आजारात मेंदूतल्या पेशी मरतात, आणि आपला आपल्यावर कसलाच ताबा रहात नाही. आजीचंही तेच झालं होतं. पुढे पुढे खाणं-पिणं, कपडे, नैसर्गिक क्रिया..या कशाचही भान तिला रहात नसे. एवढ्या हुशार बाईला हा आजार का झाला असेल हे एक कोडंच होतं!
शेवटी डॉ. ने तिला स्ट्राँग औषधं सुरु केली, ज्यायोगे ती जास्त धावाधाव करू शकणार नाही. तिची मानसिक एक्साइटमेंट कमी करताना नाईलाजाने हे करावं लागलं.
मग ती दिवसभर एका खुर्चीत बसून असे. तिच्य नजरेतून आमची कोणाची तर नाहीच, स्वतःचीही ओळख पुसली गेली. एरवी ९वारी नेसणारी ती, आता तिचं दिवसातून ३ वेळा स्पंजिंग करायचं म्हणून लुंगीसारख्या कपड्यात दिसू लागली. पूर्वी ढोपराएवढे केस होते तिचे, आई म्हणायची. आम्ही बघितले तेव्हाही छान अंबाडा असे, ते कापून बॉबकट केला.
ज्या आजीनी आम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं, गोष्टी सांगत आम्हाला भरवलं, तिला आता आम्ही भरवत होतो. वाईट याचं वाटे, की ती आता कोणालाही ओळखत नाही. नुसता श्वास घेणारी एक व्यक्ती आहे ती...हेच पचनी पडत नव्हतं.
तिला चहा आणि बटाटेवडा भयानक आवडे. (बरी असतानाही, ती पाणी कधी प्यायची हा एक प्रश्नच होता.) शेवटपर्यंत जर काही ओळखीचं उरलं असेल तर चहा, बटाटेवडा, आणि शांतू हे नाव. "गो शांतूआजी, चहा घेतेस ना?" असं आम्ही म्हटलं, की "हं" म्हणायची. तिच्या चवीच्या जाणीवा कमी झाल्या तरी गोड कळायचं नि आवडायचं. भाजी वगैरे कधी चाटवली तर चेहर्यावर नापसंती दिसे. पण वडा दिला तेव्हा चक्क अर्धा वडा खाल्ला तिने, आणि बाधलाही नाही!
हळूहळू तिचं आजरपण आम्ही मनानेही स्वीकारलं. मग आम्ही तिच्याशी गप्पा मारायचो. तिला काही कळत नसे हे वेगळं. पण तरी बोलायचो. कंटाळलो की जरा गमती करायचो. एकदा ताईने आजीला विचारलं, "आजी, अगं तुझे नाक नि डोळे कुठेयत?" आजी- "हांऽऽऽ...पूर्वी होते तिथेच आहेत!" आणि हे ऐकून आत्ते आणि ताई हसून हसून खुर्चीतून पडायच्या बाकी होत्या. खरं म्हणजे हे उत्तर तिने समजून दिलं असेल अशी काहीही शक्यता नव्हती. पण कसा कोण जाणे, बाण बरोब्बर लागला होता!
मी त्यावेळी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होते. कुठल्याही परीक्षेला जाताना आजीला नमस्कार करून मी म्हणे, "गो आजी, परीक्षा आहे माझी. पेपर चांगला जाईल असं म्हण हां!" आणि आजीही जोरात "हां" म्हणे. असं काय होतं माहिती नाही, पण खरंच पेपर छान जाई. "तुम्हा सगळ्यांवर भारी माया तिची, नि शिकताय म्हणून जास्तच, म्हणून ते कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद देतेय ती." आई म्हणे.
पण आजीची माया होती हे खरंच! मला आजीच्या या अशा असण्याची, गप्पांची, आशीर्वादाची इतकी सवय झाली होती, जेव्हा आजी गेली तेव्हा "मला माझी आजी हवीये" असा वेड्यासारखा हट्ट केला होता मी!
७ वर्षं झाली तिला जाऊन. अंत्यविधींसाठी न्यायला जेव्हा तिला उचललं, तेव्हा आई, "माझा केवढा मोठा आधार गेला!!" म्हणून उभ्या उभ्या गदगदली होती! आणि दुसर्या दिवशी सवयीने आजीच्या आंघोळीचं पाणी काढून, विसावण घालून ठेवलं होतं!!
No comments:
Post a Comment