Thursday, July 22, 2010

पोकोनोज ट्रिप

अमेरिकेमध्ये प्रत्येक ऋतू वेगळा असा अनुभवायला मिळतो. मी इथे जेव्हा आले तेव्हा थंडीचा कडाका होता. खूप बर्फ...खूप थंडी... -१५ वगैरे असायचं तापमान.
पण त्यातसुद्धा मजा होती. खरंतर बाहेर जायचं म्हणजे कंटाळवाणा प्रकार वाटे. थर्मल वेअर घालायचे, मग जीन्स वगैरे, मग स्वेटर, हातमोजे, पायमोजे, वरून ओवरकोट....इतका सगळा सरंजाम घालेपर्यंत बाहेर जायचा उत्साह मावळून जायचा.
मी जेव्हा पहिल्यांदा स्नो बघितला तेव्हा वेड लागायचं बाकी होतं. इतका बर्फ मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होते. घरात बसून खिडकीतून फोटो वगैरे काढून घेतले खूप. मग आम्ही कुठे बाहेर गेलो कि (लक्षात राहिला तेवढ्या वेळी!) फोटो काढले.
त्या सीझन मध्ये काढलेले सगळे फोटो एस्कीमोन्सारखे आले आहेत. किंवा अंतरालाविरांसारखे.
पण मग बाहेर गेलं कि आवडायचा. मुद्दाम थंडीत जायचे पण काही स्पॉट्स होते. आम्ही गेलो होतो एका ठिकाणी. पोकोनोज माऊंटन्सला, स्कीईंग करण्यासाठी. खरं तर पहाटेच निघायचं म्हणून आदल्या रात्री शिरा आणि पहाटे लवकर उठून भरपूर खिचडी करून ठेवली होती मी. पण उठायच्या नाही तरी निघायच्या हिशोबात आमची पहाट अंमळ उशिरा झाली, आणि सकाळी ९:१५ ला आम्ही निघालो.
बर्फावर स्कीईंग करणं हा एक छान अनुभव आहे. (फक्त हे समजायला ७-८ वेळा पडून, कंबर वगैरे शेकून घ्यावी लागली, आणि इतका करून धड नाहीच जमलं मला!!)विश्रामला खूप मस्त जमलं स्कीईंग. बर्फावर स्केटिंग करायलाही येतं त्याला, त्यामुळे स्कीईंग मधली मजा पण त्याला घेता आली. नव्याने स्कीईंग करणाऱ्यांसाठी एक ट्रेनिंग सेशन होतं. ते आम्ही केलं आणि मग स्वत: करायला गेलो. खरं तर त्या सेशन च्या शेवटी मी जोरात आपटले बर्फावर (बहुतेक ८ व्यांदा), तेव्हा पायात गोळा आला. मला चालणं पण जमेनासं झालं आणि एकूण सगळं बघता हीच माझी पंढरी म्हणून मी खालीच थांबले. विश्राम आणि त्याचे मित्र हिल्स वर जाऊन स्कीईंग करत येणार होते, मग मी कॅमेरा घेऊन फोटो काढायला घेतले. पण एकूण ट्रीप छान झाली. त्या वेळी ४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होत असे. मला एक तर असल्या थंडीची सवय नव्हती, त्यात भोवती सगळीकडे नुसताच बर्फ, हातमोजे घातले होते तेही पूर्ण लोकरीचे. बर्फात चालतील असे हातमोजे घालायला विसरलो होतो आम्ही. त्यामुळे हात अधिकच गार पडले होते. शेवटी ५ वाजून गेले, तिन्हीसांजा मिळाल्या आणि मी विश्राम ला सांगितलं की आता जाऊया परत नाहीतर माझा इथे पुतळा होईल. मग सगळे निघालो. मला कॅमेरा धरतासुद्धा येत नव्हता इतके हात गोठले होते. मग बेसिन शोधून, तिथे कडकडीत गरम पाण्याखाली हात धरले आणि हाय!!! सुया टोचाव्यात तशा झिणझिण्या आल्या हाताला! पण २ मिनिटात आपले हात हलू शकतायत ही सुखद जाणीव झाली, आणि आम्ही निघालो. याच्या मित्राने गाडी आणली होती, त्यात बसलो. त्यानंतर सगळ्यात छान जर काही झालं असेल तर ते हे, की पिशवीतून मी साबुदाण्याची खिचडी आणि गोड शिरा काढला आणि आम्ही ५ मिनिटात सगळं संपवून टाकलं! दिवसभर काहीही न खाता नुसती मस्ती केली होती बर्फात. आणि थोडसं अन्न पोटात गेल्यावर भुकेची जाणीव जास्त झाली. मग हायवे वर एका ठिकाणी थांबून खूप गरम कॉफी आणि खाणं खाल्लं. परत एकदा माझ्या हाताला सुया टोचून घेतल्या. इलाजच नव्हता. रात्री ८ ला घरी आलो आणि पुन्हा एकदा गर्रम गर्रम पाण्याने अंघोळ केली. मग मात्र रजई घेऊन जी झोपले ती सकाळी ९ ला उठले होते!! त्या वेळी जाणवलं कि बात जितनी सिधी लागती है उतनी है नाही!! हात पाय हलतायत ही जमेची बाजू होती, पण बाकी काम करताना पाय दुखत होताच. आपण वन पीस आलोय हाच काय तो आनंद!
अशीच थंडीची मजा घेत होते मी, आणि मग वसंत येणार....असा एकूण उत्साहाचं वातावरण दिसायला लागल आणि मी खुश झाले. एका नव्या ऋतुच स्वागत करायला मीही उत्सुक होतेच!

2 comments: