Saturday, July 9, 2011

घर

घर...आपलं स्वतःचं!
काडी काडी जमवून बांधलेलं घरटं..

मायेचा उबारा
बाहेरच्या जगाशी जोडताना
आपलं चिमुकलं विश्व जपणारा दुवा

प्रत्येक कोपर्याची स्वतंत्र आठवण
प्रत्येक भिंतीचं स्वतःचं रिंगण

हा गणपती..हा शोपीस..हि जागा घड्याळाची..इथे एखादी छानशी फ्रेम लावू..
आपणच विणायचा हा आठवणींचा गोफ

आणि घर काही फक्त आपलं नसतं
देवघरातल्या देवाचं घरपण आपणच सजवायचा असतं!

अन्नपूर्णा प्रसन्न होते ती इथेच!
आणि द्रौपदीची थाळी असते तीही इथेच

प्रत्येक खोलीची काहीतरी खासियत..
पश्चिमेचा वारा..कधी पावसाच्या धारा..
हिवाळ्याची उब कधी उन्हाच्याही झळा..

पुस्तकांची सोबत आणि गाण्याची संगत
झुल्यावर झुलताना कॉफी घ्यायची गम्मत..

घर म्हणजे नक्की काय असतं!

मस्त पाऊस असताना तळणीत पडलेल्या अळूवड्या..
एखाद्या रविवारी दुपारी कुकर उघडल्यावर घमघमणारा पुलाव..

आईचा एखादा फोन आणि निवांत गप्पा..
मैत्रिणींशी बोलायचा राखून ठेवलेला मनातला एखादा कप्पा..

कातरवेळी आपल्या माणसाची वाट बघणं, थोडीशी काळजी करणं
आणि आपली काळजी करणारं कोणीतरी घरी आहे म्हणून ओढीने घराकडे येणं..

नव्या दिवसाची स्वप्नं आणि ती पुरी करायची आस..
घराचं घरपण जपायचा ध्यास

भरारी घेताना पाय घट्ट रोवायचं हक्काचं अंगण..
वादळापासून स्वतःला जपायचं सुरक्षित कुंपण

*****************************
ताईच्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त मी केलेली कविता.

Friday, May 27, 2011

आनंदसोहळा








जेव्हा दीड वर्षापूर्वी अमेरिकेत आले तेव्हाच वजन कमी करायचा निर्णय घेतला. सोसायटीत जिमची सुविधापण होतीच. मेम्बर्शीप घेतली आणि जिम सुरु केलं. सुरुवातीला साधं चालणं नंतर हळूहळू वाढवलं. बरेचदा माझ्या जिमच्या वेळात जिम रिकामं असे. तिथे एक टेप रेकोर्डेर वगैरे होता, पण मी कधी लावला नाही तो. थोडे दिवसांनी मीही माझं आयपोड घेऊन जायला लागले. २० मिनिट चालणं आणि नंतर ५ मिनिट कुल डाउन टायमर होता माझ्या सेटिंग मध्ये. ती २५ मिनिटं मी गाणी ऐकत चालू लागले. आणि मग लक्षात आलं की इतकं लक्ष देऊन हल्ली ऐकलीच जात नाहीत गाणी! काम करताना जेव्हा ८०% लक्ष कामात असतं तेव्हा, घरात अगदीच शांत आणि एकटं वाटू नये म्हणूनच गाणी चालू असतात.

मग मात्र मी घरातून निघतानाच आज काय ऐकायचं हे ठरवून निघू लागले. पं. भीमसेन जोशींचे अभंग, हिंदी गाणी, मराठी गाणी, शास्त्रीय संगीत..यातलं काहीतरी निवडायचं आणि चालत असताना ते ऐकायचं. त्यात मग एक दिवस शोध लागला की माझ्या चालण्याचा वेग आणि ताल 'माझे माहेर पंढरी' शी जुळतोय!!! मी संपूर्ण २० मिनिटं तेच एक गाणं ऐकलं! मग कोणत्या अभंगाशी माझी चाल जुळते ते बघायचा नादच लागला. मग मी हिंदी गाण्यांकडे मोर्चा वळवला. 'बालमा खुली हवा में' हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं आणि वेड लागलं मला! मग मी त्याच तालात चालायला सुरुवात केली! :)

मग एकदा शास्त्रीय रागावर आधारित व्यायाम करायचा विचार आला मनात. मी केदार राग लावला. माझा आवडता राग. पण ठाय लयीतल्या त्या बंदिशीत मला चालायचा सूर गवसेना. शोधाशोध करताना बिहाग मिळाला. मालिनी राजुरकरान्चा. त्यातली बंदिश सुद्धा आवडली खूप. मग मी २० मिनिटं बिहाग ऐकायला सुरुवात केली. मग माझ्या मोबाइलमधला मारुबिहागही लावून बघितला. प्रभा अत्रेंची प्रसिद्ध बंदिश, जागू मी सारी रैना....ही तर माझ्या मर्मबंधातली बंदिश होती, आहे! आता मात्र जिमची सुरुवात केली तेव्हा कंटाळा येणारी २० मिनिटं मला कमी पडू लागली. शेवटचा ५ मिनिटांचा कुल डाऊन कसा सुरु होतो हे लक्षात येणार नाही इतकी मी रमले!
घाम गाळून वजन कमी केल्याच्या आनंदाबरोबर मला हा श्रवणाचा आनंद मिळू लागला. दिवसाचा सगळा वेळ जरी माझाच होता, तरी या वेळाची मी वाट बघायला लागले. दिवसभर एकटी असूनही या वेळाची मला जास्त किंमत वाटायला लागली.
अजून एक मजा म्हणजे मला आयपोड मध्ये भैरवी मिळाली. मी भैरवी खूप ऐकत नाही. कितीही ऐकली तरी मन सरावत नाही आणि डोळे ओलावतात. गाण्यातलं कळत नसूनही भैरवीतला तो कुठलासा कोमल सूर काळीज कापतो नेहेमी. मी भान विसरते भैरवी ऐकताना. जीव गुदमरतो. ही मैफिल संपली हे दु:ख खूप असतं. प्रवास संपला...आता? असं वेड्यासारखं वाटत रहातं. पण मालिनी राजूरकरांची ही भैरवी म्हणजे भैरेवी रागाची स्तुती आहे, तिचा गोडवा वर्णन केलाय...अगदी सार्थ गोडवा. 'भैरवी..प्रियदर्शनी..रागिणी..'

ही भैरवी मी योगायोगाने शेवटच्या ५ मिनिटात ऐकली आणि ठरवलं की हीच ऐकायची, आणि शेवटीच ऐकायची. व्यायाम संपल्याचं एक वेगळं समाधान मिळतं, त्या समाधानात ही भैरवी ऐकायची. आणि मग रुटीन ठरलं. २० मिनिटं बिहाग आणि ५ मिनिटं भैरवी. हे दोनही 'रिपीट' मोडवर ठेवायचं.
असं सुरु केल्यावर जो आनंद मिळायला लागला त्याला तोड नाही! इतके दिवस नुसता वजन कमी करायचं म्हणून होणार व्यायाम एक आनंदसोहळा कधी झाला माझं मलाही समजलं नाही. :)

Saturday, April 30, 2011

वाढदिवसाची भेट





सखी,

तुझा वाढदिवस जवळ आलाय. खरंतर वाढदिवस म्हणून काही विशेष सेलिब्रेशन केल्याचं नाहीच आठवत. माझ्या वाढदिवशी तू माझ्या घरी यायचं, तोवर मी नवीन ड्रेस घालून तयार रहायचं, मग आपण दोघी आजोबांकडे जाऊन त्यांना नमस्कार करून तसंच पुढे समुद्रावर जायचं. तिथे भेळ घ्यायची, आणि जरा वेगळं काही म्हणून एखादं आइस्क्रीम! झाला वाढदिवस!

आणि तुझा वाढदिवस तर बरेचदा पुण्यातच व्हायचा. म्हणजे तू पुण्यनगरीत, नि मी रत्नागिरीत. मी पेपर झाले म्हणून सुटीच्या उद्योगात, तर तू एक मोठी परीक्षा संपली तरी टि.म.वि. च्या संस्कृतच्या परीक्षेत गर्क!
दरवर्षी एप्रिल-मे मधे तू कॉलजच्या परीक्षेतून सुटायचीस नि मी अडकायचे. मग जून महिन्यात मी मोकळी नि तू अडकलेली. पण ते असो.

त्यामुळेच असेल, तुला प्रत्यक्ष तुझ्या वाढदिवशी भेटणं बहुतेक झालंच नाही, भेटवस्तू (?!) देणं दूरच. पण आज म्हटलं, द्यावंच काहीतरी. अगदी युनिक असं..

नि मग आठवलं, की या जगात "माणूस" हे एकच फीचर फक्त युनिक आहे. बाकी सगळं छापाचं...असं आपणच एकदा गप्पांच्या मैफिलीत ठरवून टाकलं होतं! मग त्यातल्यात्यात काय द्यायचं...तर काही आठवणींचा खजिना आहे माझ्याकडे, तोच तुला द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच!

आपण भेटून १-२ नाही, तब्बल ११ वर्षं झाली गेल्या महिन्यात. विश्वासच नाही बसत माझा. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्द्ल ११ वर्षांचा संदर्भ स्वतः द्यावा इतके मोठे आपण कधी झालो हेच नाही गं समजलं. ही ११ वर्षं म्हणजे कॅलेंडरची नुसती ११*३६५ अशी मोजणी नक्कीच नव्हती.

मी १२वीच्या अगोदरच्या सुटीत सगळं पुस्तक शिकून पुरं करायचं म्हणून आजोबांकडे येत होते. आणि तू, शाळेत कधी हा विषय शिकलेली नसूनही थेट BA च्या पहिल्या वर्षी, अचानक आजोबांकडे पहिल्यांदाच येऊन, "मला याच विषयात BA करायचंय" हा हट्ट करत होतीस! आजोबांची प्रेमळ काळजी. मला म्हणत नव्हते का, "अज्ञ, अगो समजाव हिला. सोपं नाहिये हा विषय असा अचानक शिकणं. म्हणावं, ऑक्टोबरातल्या पहिल्याच परीक्षेत काय करशील? ६ महिने आहेत हातात...कालिदास, भास, भवभूती...कमी का आहे हे! अगो पाहिजे तर गीता शिक. सुभाषितं शिक...पण हे काय! अगो हिचं शिकणं मला नको असायास काय झालं! मी शिकवेनच! पण हे काय अगोचरपण!" असं त्यांचं म्हणणं. मी कात्रीत. पण तू जिंकलीस. नियती कौल देत असते. माझ्याचबरोबर, त्याच दिवशी तुझीपण शिकवणी सुरु झाली. "नास्ति धीमताम् असाध्यं नाम" हा माझ्या पुस्तकातला धडा पूर्ण झाला तेव्हा नियती मला न कळत्या आवाजात कुजबुजली असेल, "खरंच आहे हे. ही बुद्धिमान मुलगी आहे, हिला असाध्य काही नाही".

पुढे तुझ्या असामान्य बुद्धीने आजोबा स्तिमित झाले. "कार्टी अगदी कुशाग्र बुद्धीची आहे. गेल्या ५० वर्षात असं पोर नाही आलं माझ्याकडे शिकायला" म्हणाले होते मला पत्रात. ८५ वर्षांचं ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, तुझा बुद्धीने चकित झालं होतं.

पुढे मी रत्नागिरीत परत आल्यावर अगदी मस्त जमली आपले मैत्री. नुसता एक फोन करायचा नि मग पुढच्या १५-२० मिनिटांत आपण समुद्रावर असायचो!
तुला आठवतं का ग, एकदा शेजारच्या दुकानातल्या काकूंनी सहज विचारलं होतं, की तुमची ओळख कशी गं झाली मुलींनो? तू फिरकी घ्यायच्या मुडात (हा शब्द तुझाच) होतीस.."काय करणार हो! गेल्या जन्मीचं पाप नडतंय आता! दोघींची ग्रहदशा..दुसरं काय!" म्हणालीस नि बिचार्‍या काकू सामान बांधायचं विसरल्या होत्या..

तशा आपल्या आठवणी म्हणजे एकाचा दुसर्‍याला संबंध नसलेल्या विचित्र गोष्टींची मालिकाच आहे नै! तुझ्या जुन्या घरात मी पहिल्यांदा रागमालिका ऐकली होती. अभिषेकीबुवांची. कट्यारीतली. नि मग सगळ्या कॅसेटी (आपला शब्द..आठवतोय ना गं?) नकलून घेतल्या होत्या. कुठल्याश्या वर्षीच्या नाट्यदर्पण रजनीच्या होत्या त्या. त्याच्या थोडेच दिवस आधी काकूला भेटले होते. "ही माझी आईस." अशी दणक्यात ओळख करून दिली होतीस. तिला मी अगोदर शिस्तीत "अहो काकू" म्हणत होते. पण ऐकेल तर काकू कसली! असं काही वागली माझ्याशी, की शेवटी "मला तुम्हाला अहो-जहो करायला जमायचं नाही. मी तुला अगं काकूच म्हणेन" म्हटल्यावर "बघितलंस गोळ्या! मी सांगितलं असतं तर स्वतःच नको म्हणाली असती..अगो मला माझी लेक नि तू काय वेगळ्या नव्हेत!" अशी तिची टिप्पणी! लाडात तुला ती गोळ्या म्हणते हे मला लागलेला शोध.

बघ, पुन्हा रस्ता भरकटले.. हे असंच होतं! तुला नेहेमी कळतं मला काय म्हणायचं असतं ते. आणि मला कळतं तू काय म्हणतेस ते. पण तरी तू ते सगळं शब्दांतही सांगू शकतेस...मला नाही जमत. वेळीच का गं सवय नाही लावलीस मनातलं शब्दांत अचूक सांगायची! तुला कळत असल्यामुळे मी कधी ते मनावरच नाही घेतलं... नि मग खूप त्रास झाला!

पण आपण मात्र काहीही त्रास झाला की समुद्रावरच जायचो थेट. तो आपला जिवाभावाचा सखा झाला होता. सगळं बिचारा ऐकून घेत असे. एकदा मी तुला म्हटलं, "याला कळत असेल का आपण काय सांगतोय ते?" तेव्हा तू म्हणाली होतीस, "त्याच्या लाटा येतायत ना आपल्या पायाशी..त्या कुरवाळून समजावतायत आपल्याला. कोणीही कितीही त्रास दिला तरी तो मनाच्या तळाशी ढकलून द्यायचा असतो असं सांगतायत त्या." आणि मग तू असं काही बोलायचीस. मी ऐकत बसायचे. त्यात कधी शाकुंतलातला दाखला द्यायचीस, कधी शंकराचार्यांची चर्पटपंजरीका असायची. कधी काकूच्या खजिन्यातल्या ज्ञानेश्वरीतलं काही असायचं..विषयाला धरबंध नसेच मुळी कधी.

आणि आठवतं तुला? आपण नवीन वर्षाची पार्टी करणार होतो, दोघीच. पावभाजी करायला मी येते म्हटलं होतं तुला, पण ओट्याचं काम करायला माणसं येणार आहेत असं सांगून मी यायच्या आत तुझी भाजी तयार होती. पहिल्यांदाच करत होतीस तू. त्यातपण स्वतःची भर घातली होतीसच, नि मी वैतागले होते! मसाला चमचाभर कमी पडला तर तेवढा तू चक्क साम्बारमसाला ढकलून मोकळी झालीस! वर मलाच "नशीब समज, आयशीला नाही इथे ढवळाढवळ करायला दिली मी. मला मदत म्हणून सुकं खोबरं वगैरे घालून वाटण करून देऊ काय म्हणून विचारत होती...कसली पावभाजी मिळाली असती तुला!" वगैरे सांगून थंड केलं होतंस. अणि मग ती अफाट भाजी खात आपण "तरूण तुर्क म्हातारे अर्क" बघितलं होतं...

हरे राम! ते नाटक बघताना घरातल्या हॉलच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत नुसत्या लोळत होतो आपण आणि हसून हसून पोट दुखायला लागलं होतं आपलं. आपलं खिदळणं ऐकून मधे दचकून बिचारी काकूपण येऊन गेली, नक्की पोरीना झालं काय ते बघायला!

पण मग हे दिवस फार काळ टिकलेच नाहीत. माझं उष्टं कुठेतरी दूर नाशकात सांडायचं होतं...मी अ‍ॅडमिशन मिळाल्यावर गेलेच तिकडे. आणि मग पत्रांतून गप्पा. कधीतरीच.

मधल्या काळात खूपसे भले-बुरे अनुभव घेऊन दोघी आपापल्या परीने सावरत होतो. नव्याने खेळ मांडत होतो. नाशकात जेव्हा पहिला पाऊस अनुभवला तेव्हा तो डोळ्यात कधी उतरला समजलंच नव्हतं मला. हॉस्टेलच्या गॅलरीतून न भिजता रूममधे आलेली मी, मनाने मात्र पूर्ण भिजले होते. जीव तुझ्यासाठी अर्धा अर्धा होत होता.

सारखं वाटे, तू जाणारच नाहीस आता समुद्रावर..गेलीस तर तो विचारेल तुला, की एकटीच? तिला नाही आणलंस?
तू एकटीने भेळ, पावभाजी, रगडा पॅटिस...काही खाणार नाहीस. कॉफी तर आणायचीच नाहीस मी येईतो!
आणि नवीन गूळ आणला की काकूला माझी आठवण येणारच...खात्री होती मला. पावसाची झड लागली की नुसतीच बसशील तुझ्या खोलीच्या गॅलरीत. कॅसेटी लावयचं नाहीच सुचणार तुला..आणि गाण्याच्या कार्यक्रमालाही जायची नाहीस. संगीत नाटकं कोणाबरोबर बघशील? कंटाळा आला तर खास टिवल्याबावल्या करण्याच्या कॅटेगरीतले सिनेमे बघशील का?
आणि तुझं ते अद्भुत यंत्र बिघडलं तर काहीही करणार नाहीस. "प्रज्ञा, तो डबा सुरु होतो का बघ गं... मी त्या उंदरावर क्लिक केलं की तो भलतीकडेच काहीतरी उचापत करतो" हे तू कोणाला सांगशील म्हणून मी हैराण झाले होते. त्याबाबतीत मात्र तुला शब्द मिळत नसत, नि मला मात्र नेमकं कळे तुला काय म्हणायचंय ते!

नाशकात गेल्यावर हा थोडा त्रास झाला, पण मग तू नसायची सवय केली मीच. "मी तुझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल विचार करते" हा माझाच माज. न सावरून सांगते कुणाला!

पुढे मग सुटीत भेटणं वगैरे...एव्हाना तुझं MA सुद्धा होत आलं होतं! मधेच तुला एखादं "स्थळ" आलं की मी अस्वस्थ होई. थोडी पझेसिव्ह झाले होतेच मी. पण मग तोही वेडेपणा गेलाच माझा.

कधीकधी वाटे, कशाला वागायचं शहाण्यासारखं! जरा वेडपट असलेलं बरं असतं... उगीच कोणी भलभलत्या "वेव्हारिक" वगैरे अपेक्षा ठेवत नाही मग आपल्याकडून. आपण वेड्या होतो म्हणूनच तर जमलं नै आपलं!

अख्खाच्या अख्खा ग्रंथच वहीच उतरवून घ्यायचा झाला तर..वि. वा. शंकर अभ्यंकरांचे भक्तिकोश कधी मुखोद्ग्त करता आले तर.."कर्मण्येवाधिकारस्ते.." हा श्लोक पर्त्यक्षात(मुदामच हाच शब्द वापरायचा) कधी आणता येईल..
'आर्यांचे मूलस्थान' या पुस्तकात 'आर्य' नि 'द्रविड' हेच दोन मुख्य प्रकार दिसतात, मग कब्रा, कोब्रा नि देब्रा आले कसे हा पडलेला मजेदार प्रश्न! दिवाळीला देवदर्शन आपण एकत्र न जाता आपापलं करायचो, नि आल्यावर, "बाळे, फुगा आणलास का स्वतःसाठी" अस तुझा मला फोन...

भेळीचा कागद वाचताना एखादं सुभाषित असेल तर त्यावर तुझं काहीतरी म्हणणं...मग गाडी ट्रॅक सोडून भलतीकडेच जाणार. हल्ली खल्वायनवाले कोणालाही बोलावतात गाणं गायला पाडव्याला इथपासून आजोबांच्या घराचा केअरटेकर सध्या गावी गेलाय इथपर्यंत काहीही असे त्यात!

चुकुनमाकून माझ्या अभ्यासाचा विषय निघालाच, तर "काय ते नीट करत्येस ना! मला काय, रेडिओ नीट चालल्याशी कारण..." (कारण मी electronics and telecom वाली, आणि तुला तेवढंच लक्षात ठेवायचं होतं मुद्दाम!) एवढं बोलून तू मला दुसर्‍या विषयाकडे वळवायचीस.
मग, संत तुकाराम सिनेमात खरी भाव खाते ती आवली. आपण रडतो ते तिच्यासाठी, हे तत्त्वज्ञान तू मला सांगणं, नि ते चक्क मला पटणं! सुधीर फडक्यांची गाणी दुसर्‍या कोणी गायली की तुझ्या चेहर्‍यावरची ठळक आठी. मंगूअण्णांचं (आपले पाडगावकर गं..माझा शब्द म्हणून विसरली नाहीस ना?) "नक्षत्रांचे देणे" काकूने आणलं तेव्हा त्या अद्भुत यंत्रात (हेच नाव जास्त योग्य आहे त्या संगणकाला) तिला ती सीडी घालून देणं..."आई, मला यायला जरा वेळ लागेल." असा मी तुझ्या घरातून निघायच्या वेळी फोन करणं...मग दाराशी चालणारी आपली स्टँडींग मीटिंग..
तू कधी मला सोडायला दाराच्या पुढे यायची नाहीस, नि एकदा तुझा धाकटा लाडोबा आला तेव्हा खालपर्यंत आली होतीस...मग मी वैतागणं नि तू आणि त्याने माझी चेष्टा करणं..

तू मला एकदा पत्रातून "बटाट्याचा रावसाहेब" ही भन्नाट रेसिपी दिली होतीस. मी हॉस्टेलात आहे ही माहिती असूनही रेसिपी का दिलीस ते मला कळत नव्हतं. मी पत्र वाचून फक्त घडी करून ठेवून दिलं. कहर म्हणजे तू ते बेबी प्रिंट्च्या कागदावर लिहिलं होतंस, "तू छोटी ना, म्हनून चित्लं चित्लं अशलेला कागद" हे अस्संच बोबडं लिहिलं होतंस त्यात! मग ती रेसिपी देताना तुझी हीच अक्कल कुठे गेली होती हा प्रश्न मी पत्रातच घडी करून ठेवला होता. माझं ५ महिन्यांनी असलेलं धाकटेपण मात्र मी खूप मिरवलं!

यथावकाश आपली शिक्षणं उरकत होती. तुझ्या लग्नात मीच करवली! दागिने घेताना काकांनी मला फोन करून बोलावलं होतं तेही भारीच होतं.
जिजू जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा ती भेट पहिली न वाटावी एवढे ते छान मिक्स झाले होते आपल्या सगळ्यांमधे. अजूनही ते आपल्या या मैत्रीवरून चकित होतात का गं?

"यथा काष्ठं च काष्ठं च..." हे अगदी पटतं मला. नाहीतर आज एवढी आठवण कशाला आली असती मला तुझी! थोड्या वेळापूर्वी कणीस खात होते भाजून आणि कळ उठली मनात...वाटलं लिहावं हे सगळं. भेटावं तुला. निदान पत्रातून तरी. तुला वाटेल, शेवटी मी पत्र गुंडाळलंय. पण काय करू! सगळं शब्दांत मांडता यायला मी म्हणजे तू नव्हेस ना!

असो! ही भेट आवडली का नक्की कळव.
तुझ्या उत्तराची वाट बघू ना?

-प्रज्ञा.
*****************************************************

तळटीपः माझ्या सखीला स्वतःचं नाव आहे, पण ते इथे मुद्दाम दिलं नाहिये. ती माझ्यासाठी "सखी"च आहे. त्यामुळे अर्थातच वर लिहिलेलं काहीही काल्पनिक नाही.

******मायबोलीवर पूर्वप्रकाशित http://www.maayboli.com/node/25405

Wednesday, March 16, 2011

शांतूआजी

तसं माझ्या आजीचं माहेरचं नाव शांती, सासरचं सुमती. पण सुमती हे नाव फक्त कागदोपत्रीच होतं. सगळे शांतूताई/मावशी/आत्ते म्हणत. तिच्या भावंडात ती मोठी, सासरीही मोठी सूनच. सासरी कोणी तिला नाव घेऊन हाक मारलेली मल आठवत नाही. नुसतंच वहिनी/मामी/काकू म्हणत असावेत.

सासरी राजापुरात एकदा जावेशी भांडण झालं, आणि या दोघींचं जमणं कठीण, म्हणून आजोबा बदली घेऊन रत्नागिरीला आले ते कायमचेच. (दुर्दैवाने आजोबा खूप लवकर गेले. ते गेल्यावर वर्षभरात बाबांचं लग्न झाल्यामुळे आईनेही आजोबांना बघितलेलं नाही.)

आजीला शिक्षणाची खूप आवड होती. ती स्वतः चौथीच्या पुढे शिकू नाही शकली, पण तिने स्वतःच्या धाकट्या बहिणीला रत्नागिरीत आणून शिकवलं. पुढे मग तिची भाचरं, कोणी नात्यातली मुलं वगैरे रत्नागिरीत आले की तात्पुरती सोय म्हणून आमच्या घरी रहात, वसतिगृह मिळालं की तिकडे लागेल तीही मदत आजी करत असे. तिने तिच्या दोन्ही मुलींना आवडीचं शिक्षण घेऊ दिलं. पुढे त्या दोघींनीही नोकरी केली. बाबा म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा, पण लहान असतानाच बाबांना तिने शाखेत जायची सवय लावली आणि बाबा पुढे संघाचं काम करू लागले. एकच्या एक मुलगा असूनही कसं काय शाखेत पाठवलं....पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून बाबांनी लग्न न करायचा निर्णय घेतला असता तर...वगैरे प्रश्न लोक आजीला विचारत. पण आजी प्रखर देशभक्त होती. (आम्ही कधी कधी तिची चेष्टा करायचो. शिवाजीमहाराज, भगतसिंग, अटलबिहारी..................आणि मग फक्त माझे बाबा हेच काय ते ग्रेट राष्ट्रभक्त असं तिला वाटतं असं आम्हीच चिडवत असू तिला ). तिचं वाचन खूप होतं. ती कुटंबकथांत रमे, पण भगतसिंगांचं चरित्रही तिला पाठ होतं. लहानपणी ती आम्हाला शिवाजीराजांच्या आणि भगतसिंगांच्या गोष्टी सांगे.

एकदा मला आठवतंय, गोष्ट सांगताना दिलेरखानाचा उल्लेख होता. आजीला या दिलेरखानाची फार म्हणजे फारच चीड येई. "फितवलंन ना त्याने संभाजीराजाना!" हे त्याचं कारण! आणि मग पुढे तिची अवस्था पुलंच्या हरितात्यांसारखी झाली होती.

ज्या वेळी भाजपचं सरकार एका मताने पडलं होतं त्या वेळी, "मेल्यानो!! देशाचं भलं करतायत अटलजी, तर बघवेना तुम्हाला!" म्हणून विरोधकांवर चिडली होती. "बाबी गो, माझा जन्म १९२६ सालचा, आणि अटलजी १९२४ चे! आम्ही एकाच पिढीतले! म्हणून जास्त आदर वाटतो गो!" असं म्हणाली होती मला.

तशी धाडसी बाई होती ती. रत्नागिरीत आमचे जेवढे नातेवाईक होते त्यांच्याकडे तिची महिन्यातून एखादी तरी खेप होत असे. वरच्या आळीतून माळनाक्यावर चढण चढून चालत जाणे हे काय दिव्य आहे ते तिथे राहिलेल्यांना कळेल, पण आजीला काही नाही त्याचं! ती सरळ उठून चालू पडे आणि तिच्या भाच्या वगैरे असतील त्यांना भेटून येई. किती वेळा बाबा सांगत, मी सोडतो, किंवा बस ने जा....पण ती कोणावरही अवलंबून नाही राहिली. रत्नागिरी निदान माहितीतली तरी होती, पण दर मे महिन्यात ती मुंबईत गोरेगावला जात असे, तिच्या भावंडांकडे, आणि मग तिथून बोरिवलीला माझ्या आत्याकडे, आणि इतर ठिकाणच्या नातेवाईकांकडे चक्क लोकलनेही जायची.

आजी एकूणच खूप सोशल होती. घरातही हेच संस्कार होते. तिने घरात कधीही कोणतंही सोवळं पाळलं नाही. स्वतःच्या मुलींना बाजूला बसायला लावलं नाही, तसं सुनेलाही नाही. खरं म्हणजे माझी आई जरा जुन्या संस्कारात, कुटरे नावाच्या खेड्यात मोठी झालेली, तिला सोवळं नाही हेच पचनी पडायला वेळ लागला होता. पण आजीने तिला कसल्याही परंपरांमधे अडकवलं नाही. तिच्या शाळेतल्या सहशिक्षिकांबद्दलही आजीला कौतूक होतं. सून म्हणून टिपिकल सासुरवास तिने कधीच नाही केला आईला. नाही म्हणायला ती बाबांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होती. पण ते आम्हालाही जाणवायचं. घरात काही गोड-धोड केलं की, "बाबी गो...बाबास ठेव हो थोडं" म्हणायची. मग आम्हीही म्हणायचो, "आजी, अगं तुझा मुलगा आहे तो, पण आमचेही बाबाच ना! आम्हाला घास गोड लागेल का बाबांना नाही ठेवला तर!" आईला कधी कधी त्रास होत असे याचा. स्वयंपाकघरात आजीची सत्ता (हा तिचाच शब्द ) होती. पण एरवी आजी आम्हा तिघींना मायेने सांभाळे. आजी घरात असल्यामुळे आईला शाळेत जाताना कधी आमची काळजी नाही वाटली. तशी आम्हाला एक बाळगती बाई होती, पण आजीचंही लक्ष असे आमच्यावर. तसा आजीचा आईवर खूप विश्वास होता. बाबा संघाच्या कामासाठी फिरतीवर असत, पण आजीला आईचा आणि आईला आजीचा आधार वाटे. १९७५ साली जेव्हा आणीबाणी होती, तेव्हा बाबा १६ महिने राजकीय कैदी म्हणून तुरुंगात होते. त्या वेळी दोघींनी एकमेकींना जपलं.

आजीच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर असल्यामुळे खरंतर मला आजी जास्त आठवते ती वयामुळे विस्मरण वाढलेलीच. आयुष्याची शेवटची २ वर्षं ती बेडरिडन होती, अल्झायमर्स होऊन. पण त्याधीची ६-७ वर्षं टप्प्याटप्प्याने तिला हा आजार होतच होता. पण वयामुळे वाढणारं विस्मरण असेल या समजुतीत त्याचं गांभीर्य कळलं नाही.

माझे बाबा आणि आत्त्या एकाच शाळेत शिकवत. घराजवळ शाळा. मधल्या सुट्टीत चहा प्यायला दोघंही येत घरी. आजी चहा करे. एकदा तिने चहा गॅसवरून उतरवताना गॅस बंद केलाच नाही, शिवाय गावि (सांडशी/पक्कड याला कोकणांत काही ठिकाणी गावि म्हणतात) घेण्याऐवजी तिने पदराने पातेली उचलली. नेमकं आत्तेने हे बघितलं आणि पटकन जाऊन गॅस बंद केला. ही सुरुवात होती. आपण असं का केलं, गॅस बंद केलाच नाही वगैरे काहीही तिच्या लक्षात आलं नाही. पुढे हे प्रकार खूप वाढले. घरातून बाहेर पडून मागच्या आगरात गेली की यायचा रस्ता विसरायची. मग शेजारी जाऊन सांगायची, "मी रायकर सरांची आई. इकडे आगरात आले होते, आता घरी जायचा रस्ता विसरलेय. मला कसं जायचं ते सांगाल का?" आणि मग शेजारची काकू तिला घरी आणे. नशीब आमचं, की आपण कोण हे तिच्या लक्षात होतं.

पण नंतर ती खूप व्हायोलंट होऊ लागली. आणि आपण काय करतोय, का करतोय हेही तिला कळेनासं झालं. २० किलोचं मीठाच्या पिशव्यांच अख्खं पोतं तिला विहिरीत नेऊन टाकावंसं वाटलं. तिने ते उचललंही होतं!! बाबांनी वेळीच बघून तिला परत आणलं घरात. मुख्य दाराची कडी उघडता येत नाही म्हणून सरळ तिने ती कोयंड्यातून उचकटली होती. तिच्या या प्रकाराने आम्ही सगळे हबकलोच होतो. शेवटी मानसोपचारतज्ञांना भेटून हे सगळं सांगितलं. त्यांनीच हा आजार सांगितला. जेव्हा आपली सारासार विचार करायची मानसिक शक्ती संपते, तेव्हा त्याचं अफाट शारीरिक क्षमतेत रूपांतर होतं. एरवी आपण कधीच अवजड गोष्टी हातळू/उचलू शकत नाही कारण आपलं कॉन्शस मन आपल्याला ते करण्यापासून अडवतं. पण या आजारात मेंदूतल्या पेशी मरतात, आणि आपला आपल्यावर कसलाच ताबा रहात नाही. आजीचंही तेच झालं होतं. पुढे पुढे खाणं-पिणं, कपडे, नैसर्गिक क्रिया..या कशाचही भान तिला रहात नसे. एवढ्या हुशार बाईला हा आजार का झाला असेल हे एक कोडंच होतं!

शेवटी डॉ. ने तिला स्ट्राँग औषधं सुरु केली, ज्यायोगे ती जास्त धावाधाव करू शकणार नाही. तिची मानसिक एक्साइटमेंट कमी करताना नाईलाजाने हे करावं लागलं.
मग ती दिवसभर एका खुर्चीत बसून असे. तिच्य नजरेतून आमची कोणाची तर नाहीच, स्वतःचीही ओळख पुसली गेली. एरवी ९वारी नेसणारी ती, आता तिचं दिवसातून ३ वेळा स्पंजिंग करायचं म्हणून लुंगीसारख्या कपड्यात दिसू लागली. पूर्वी ढोपराएवढे केस होते तिचे, आई म्हणायची. आम्ही बघितले तेव्हाही छान अंबाडा असे, ते कापून बॉबकट केला.
ज्या आजीनी आम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं, गोष्टी सांगत आम्हाला भरवलं, तिला आता आम्ही भरवत होतो. वाईट याचं वाटे, की ती आता कोणालाही ओळखत नाही. नुसता श्वास घेणारी एक व्यक्ती आहे ती...हेच पचनी पडत नव्हतं.

तिला चहा आणि बटाटेवडा भयानक आवडे. (बरी असतानाही, ती पाणी कधी प्यायची हा एक प्रश्नच होता.) शेवटपर्यंत जर काही ओळखीचं उरलं असेल तर चहा, बटाटेवडा, आणि शांतू हे नाव. "गो शांतूआजी, चहा घेतेस ना?" असं आम्ही म्हटलं, की "हं" म्हणायची. तिच्या चवीच्या जाणीवा कमी झाल्या तरी गोड कळायचं नि आवडायचं. भाजी वगैरे कधी चाटवली तर चेहर्‍यावर नापसंती दिसे. पण वडा दिला तेव्हा चक्क अर्धा वडा खाल्ला तिने, आणि बाधलाही नाही!

हळूहळू तिचं आजरपण आम्ही मनानेही स्वीकारलं. मग आम्ही तिच्याशी गप्पा मारायचो. तिला काही कळत नसे हे वेगळं. पण तरी बोलायचो. कंटाळलो की जरा गमती करायचो. एकदा ताईने आजीला विचारलं, "आजी, अगं तुझे नाक नि डोळे कुठेयत?" आजी- "हांऽऽऽ...पूर्वी होते तिथेच आहेत!" आणि हे ऐकून आत्ते आणि ताई हसून हसून खुर्चीतून पडायच्या बाकी होत्या. खरं म्हणजे हे उत्तर तिने समजून दिलं असेल अशी काहीही शक्यता नव्हती. पण कसा कोण जाणे, बाण बरोब्बर लागला होता!

मी त्यावेळी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होते. कुठल्याही परीक्षेला जाताना आजीला नमस्कार करून मी म्हणे, "गो आजी, परीक्षा आहे माझी. पेपर चांगला जाईल असं म्हण हां!" आणि आजीही जोरात "हां" म्हणे. असं काय होतं माहिती नाही, पण खरंच पेपर छान जाई. "तुम्हा सगळ्यांवर भारी माया तिची, नि शिकताय म्हणून जास्तच, म्हणून ते कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद देतेय ती." आई म्हणे.

पण आजीची माया होती हे खरंच! मला आजीच्या या अशा असण्याची, गप्पांची, आशीर्वादाची इतकी सवय झाली होती, जेव्हा आजी गेली तेव्हा "मला माझी आजी हवीये" असा वेड्यासारखा हट्ट केला होता मी!
७ वर्षं झाली तिला जाऊन. अंत्यविधींसाठी न्यायला जेव्हा तिला उचललं, तेव्हा आई, "माझा केवढा मोठा आधार गेला!!" म्हणून उभ्या उभ्या गदगदली होती! आणि दुसर्‍या दिवशी सवयीने आजीच्या आंघोळीचं पाणी काढून, विसावण घालून ठेवलं होतं!!

Friday, February 11, 2011

सर्दी- एक वाहता अनुभव

आक्छ्यी!!!आक्छ्यी....आक्छ्यी..!!!!!...........

एका सुखद वीकांताच्या सुसकाळी मी ६ शिंकांची सलामी दिली. सर्दीने वाजतगाजत आपल्या मुक्कामाची वर्दी दिली.
खरंतर सर्दी माझी खूप जवळची, जुनी मैत्रीण आहे. आली की ४-५ दिवस खूप लाडाने पाहुणचार करून घेतेच ती! पण सायनस ची पीडा म्हणून आली तरी सायलेंट मोडवर असते. म्हणजे डोकं जड, नाक ब्लॉक झालेलं, आवाज खर्जात गेलेला असा प्रकार असतो. शिंकांची फैर वगैरे नसते कधी. याच वेळी कय बाई हे नवीन, म्हणून मी विचारात पडले!

साधारण ११ वाजता हा प्रकार घडला. संकष्टीचा उपास नव्हता, पण आवडते म्हणून साखि करायची होती संध्याकाळी. साबुदाणा भिजत घातला होता. नवरा काही कामासाठी गेला होता, त्याचं काम झालं की मला फोन करणार होता. मग मी साखि करून घेऊन जायचं असं ठरलं होतं. न्यूयॉर्कात फिरताना मी बरेचदा असं काहीतरी खायला करून घेऊन जाते.
..पण अचानक आलेल्या या पाहुणीमुळे सगळा प्लॅन बदलतोय की काय अशी भिती वाटायला लागली मला. १२-१२:३० ला जेवण झालं की बरं वाटेल म्हणून लक्ष नाही दिलं. पण भूकच नाही की हो लागली! डोकं जड झालंय नं, त्यामुळे होत असेल असं, म्हणून मग वाफ घ्यायचं ठरवलं.

मग एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून लग्गेच मी नाकाला आणि कपाळाला विक्स चोपडलं. घरात अस्वस्थ फेर्‍या मारायला लागले. काय करांवं बरं...
अशी कशी झाली सर्दी!!
इतकी भरमसाठ नाही खाल्ली काही मी द्राक्षं!
जरा कुठे बाहेर गेले, -६ सेल्सिअसमधे, तर असा त्रास का व्हावा! ही काही पहिली थंडी नाही माझी इकडची!
आता जरा बरं वाटतं म्हणून ऊन ऊन पाण्याने जास्त वेळ केली म्हणते मी आंघोळ, पण म्हणून लग्गेच सर्दी!! हरे राम!
तरी बरं, आईस्क्रीम नाही खाल्लंय अजून....
आता हा अनुभव माबोवर टाकावा काय!
काय म्हणून टाकावा...ललित...की विनोदी..की आरोग्य मधे? की विरंगुळ्यात?
पण विनोदी लिहिलंय कुठे कधी!! "छान प्रयत्न आहे, अजून थोडे पंचेस हवे होते" ही प्रतिक्रिया नक्की रिपीट होईल...
ललित काय...एक चिमुकला अनुभव, जो सगळ्यांना येतो...तो मी काय वेगळा म्हणून लिहिणार!!
मग एक हृद्य का काय म्हणतात तसलं काही लिहावं काय! पण सर्दी हृद्य कुठे, नस्य आहे ना!! मग तसला विभाग नाहीच की माबोवर!!
आणि लिहिलं तरी काय म्हणून लिहावं! काय लिहावं पेक्षा याच प्रश्नाने डोक जास्त जड झालं माझं!
"उगिच आपली बोटं बडवली आणि कुटाळकी* केली" असं होणार बहुतेक...

(कुटाळकी=कीबोर्डावर टायपून केलेली वाङमयनिर्मिती. पुलंनीच एका ठिकाणी "टाईप करणे" याला गमतीत "कुटणे" म्हटलंय. त्यावरून सुचलेला शब्द)

दोन सुयांच्या कचाट्यात सापडलेल्या लोकरीच्या धाग्याचा गुंडा कसा घरंगळत जातो आणि जास्त गुंततो, तसं झालं माझ्या विचारांचं.
ठाण्...ठाण्....
खळ्ळ्..खळ्..

हे काय!! मला ताप बिप आला की क्कॉय!! म्हणजे अंग गरम होऊन सर्दी आतल्या आत का उकळतेय! आणि डोक्यातून असे आवाज का येतायत!!

आणि एकदम माझी तन्द्री मोडली....गॅसवरचं पाणी उकळलं होतं, आणि त्यावर अर्धवट ठेवलेलं झाकण ठणठणत होतं.
मी चटकन पातेलं खाली टेबलवर घेतलं, निलगिरीचे २-३ थेंब टाकले त्यात, आणि स्कार्फने चेहरा वगैरे झाकून वाफ घ्यायला सुरुवात केली.

अहाहा....काय ऊबदार वाटतंय!
सगळा सायनस पोर्शन कसा शेकून निघतोय छान..("अगं शहाणे...एवढं सगळं कळतंय..तर रोज कर की प्राणायाम! कपालभाती...भस्त्रिका, उज्जयी, शिवाय जलनेती...करायचं तर काही नाही..उगिच आपली बॅडबॅड.." हे दुसरं मन नावचं अवसानघतकी प्रकरण )
नाक कसं हलकं वाटतय आता...डोकंही ठणकायचं कमी होतय बहुतेक.. ("काही नाही...उगिच भास आहे हा! ३-४ दिवस तरी त्रास होणारच! व्यायाम करायचा नाही...मग असंच होणार"..दु.म.ना.अ.प्र.)
आता पाणी जरा कोमट झालंय...मग कान पण शेकावा...मान वळवून कानाला शेक द्यावा..मगाशी शिंक आली तेव्हा कानात दडा बसला होता, जांभई दिल्यावर सुटला. ("तुला ना आळसच भारी...जांभईचं फक्त निमित्त..."दु.म.ना.अ.प्र.)

शेवटी पाणी गार होत आलं तेव्हा हा कार्यक्रम (दोन मनांच्या जुगलबंदीसकट) संपला.
आता तरी भूक लागेल अशी आशा मात्र मावळली. खायची इच्छाच होईना!

असेच २-३ तास गेले. एव्हाना सर्दीने बाडबिस्तरा चांगलाच पसरला होता. डोळ्यांतूनही पाणी वहायला लागलं होतं. अगदी रडवेली दिसत होते मी!

पुन्हा ३ तासांनी वाफेचा कार्यक्रम झाला. या वेळी भूक नाही, पण झोप मात्र नक्की यायला लागली.
"असा काय हा....किती वेळ लागेल माहिती नाही पण निदान एक फोन तरी करायचा!!" म्हणून नवर्‍यावर रागही काढून झाला!! अर्ध्या तासाचं उताणं, पालथं, कुशीवरचं वगैरे शवासनही करून झालं! (म्हंजे झोप हो!!)

मग मात्र मीच फोन करून "घरीच ये, मला सर्दी झालिये, आणि बाहेर -११ से. आहे, नको जाऊया" असं नवर्‍याला सांगितलं. आला बिचारा.

-----------

त्याच वीकांताच्या दुसर्‍या सकाळी मी उठल्या उठल्या नवर्‍याला म्हटलं, "मला ना, डोक्यावर काठोकाठ भरलेला माठ ठेवलाय असं वाटतंय.."आणि परत आडवी झाल्ये!
"देवा! झोपेत पण हिला उपमा वगैरे सुचतायत...कसं होणारेय तुलाच माहित!" वगैरे विचार नक्की आले असतील ह्याच्या मनात!

उठल्यावर सगळं आवरलं, खाणं झालं, पण कसलीच चव कळत नव्हती. रोजच्या वरणभाताचा कंटाळा आला होता, सांबार करायचा बेत केला. पण सांबाराची चव घेताना काय कमी आहे, काय जास्त झालंय..काहीही कळेना! एरव्ही नुसत्या वासाने मीठ कमी-जास्त आहे का कळतं मला (सवयीच्या पदार्थांमधलंच फक्त) पण आज चवीनेही कळेना!
पुलंची आठवण झाली. सर्दी झाली की पोळी खाल्ली काय, नि पोस्ट्कार्ड खाल्लं काय..एकच! हे त्या क्षणी पटलं मला!

अखंड शिंका...दर २ तासांनी नवीन पेपर टॉवेल...

वाफ घेऊन उजळलेला चेहरा(इश्श्य!)..लालबुंद झालेलं नाक आणि गाल..पाणीदार डोळे...
"असा मेकप लग्नात सुद्धा टिकत नाही नै!!" हे माझंच निरीक्षण!

हं!
रविवारसुद्धा असाच नाकाने वाहता ठेवला.

सोमवारी जऽऽऽरा कमी आहे सर्दी असं वाटलं. संध्याकाळी मैत्रिणीचा फोन, कशी आहेस विचारायला. तिने घरगुती ह्युमिडिफायर म्हणून साध्या नॉर्मल टेंपरेचरच्या पाण्याने ३/४ भरलेली बादली कोपर्‍यात ठेवायला सांगितली.
हा उपाय मानवला, आणि सर्दीचे माघरपणाचे ३ दिवस संपले म्हणून तिनेही निरोपाचे भैरवी आळवायला घेतली.
आता बरीच कमी झाली सर्दी...
सासरी चालली आहे परत ती..जाताना तहानलाडू, भूकलाडू करायला हवेत तिच्यासाठी!
अजून भैरवी संपली नाहिये, उलट आता भेट (बहुतेक) पुढच्या वर्षी म्हणून एकएक सूर आळवणं चाललंय!
पण मैफीलीची सांगता होतेय..
बरंय..

पुन्हा भेट होईल तेव्हा नवीन काही असेल बहुतेक...



--------------मायबोलीवर पूर्वप्रकाशित
http://www.maayboli.com/node/23007

Tuesday, November 2, 2010

मुलतानी ते भैरवी

बेदिल हा दिलरुबा जिवाचा छळते ही बेचैनी
आज दिलाच्या सुलतानास्तव झुरते ही मुलतानी!

परवाच पेपर मध्ये वाचलं, की 'सं. कट्यार काळजात घुसली' मधली ही रागमाला आता दिवाळी अंकामध्ये ऐकायला मिळेल. बरंच वाटलं. वाचून. (म्हणजे इंटरनेट वर, एमपी 3 मध्ये ऐकता येईल)

खरं तर माझा आणि शास्त्रीय संगीताचा फार म्हणावा असा संबंध नाही. माझी ताई हार्मोनीयम शिकायची तेव्हा मी पण थोडीफार हौस फिटवून घेत असे इतकंच. पण नाट्यसंगीत वगैरे ऐकायला अगदी ९-१० वर्षांची असल्यापसून आवडायचं.

कळायचं काही नाही. पण त्या वयातही फिल्मी गाणी कमीच ऐकली. पुढे ती कमी भरून काढली ती redio वर लागणारा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ऐकून. मग तेव्हा मात्र खूप ऐकली. पण नाट्यगीत काहीतरी वेगळंच आहे हे मात्र समजलं होतं तोवर.

पुढे ११ वी-१२ वीत असताना, पुण्याला, माझी रूम मेट रोज सकाळी उठून रियाझ करायची. आमच्या रूम च्या जवळच तिच्या आत्त्याची खोली होती. आत्या नवीन घरी रहायला गेल्यावर ती खोली म्हणजे सुचाची म्युझिक रूम झाली होती. पहाटे तिचा रियाझ ऐकू आला की जीव अगदी एवढा एवढा होऊन जाई! सुरेख लागलेला तानपुरा पहाटे पहाटे ऐकायचं भाग्य होतं माझं! मलाही अभ्यासाला बसताना अगदी फ्रेश वाटायचं. तिची बहिण सीमा तबला वाजवायची तेही तितकाच छान वाटायचं. आम्ही शाळेत असताना कार्यक्रमात तबला-पेटी असे, पण असा हा 'रियाझ' ऐकतोय म्हणजे काहीतरी मोठं काम करतोय असा वाटे मला. माझी १२वी असल्यामुळे जास्त थांबत नसे मी रूम वर, लायब्ररी मध्ये जाऊन दिवसभर अभ्यास झाला कि मग संध्याकाळी क्लास, मेस मधून जेवण वगैरे आटपून येत असे मी. पण त्यामुळे सकाळी जाताना आणि रात्री आल्यावर या दोघींचं गाणं ऐकून दिवस सुखात जायचा. गाण्याची ओढ किंवा चटक अशी लागली. मग ती कमी झालीच नाही.

डिप्लोमा साठी परत रत्नागिरीला आले आणि मे महिन्यात नाटक बघायची हौस करून झाली. 'कट्यार..' तेव्हाच पाहिलं मावशीबरोबर जाऊन. मानापमान, स्वयंवर, एकाच प्याला, शांतीब्रह्म...आणि नाट्य संगीताचे कार्यक्रम भरपूर ऐकले. रागमाला तेव्हाच ओळखीची झाली. पुढे प्रत्येक रागाशी तोंडओळख झाली. गाणं शिकणं शक्य नव्हता, आणि हट्टही नव्हता. जे मिळत होतं त्यात समाधान होतं. पण हळूहळू माझ्या संग्रहात तबला, सतार, पेटी, बासरी, संतूर अशी rekordings वाढत होती. सीडीचा जमाना आल्यावर तर अनेक गोष्टी एका सीडी मध्ये आल्या. माझं संग्रह वाढला.

अनेक दिग्गज मंडळींचे सूर कानावर पडू लागले. आईचा कायम पाठींबा होता. बाबाही कधी काही बोलले नाहीत. फक्त अभ्यास होतोय न याकडे मात्र त्यांचा लक्ष असे. त्यात काही कमी-जास्त वाटला तर मात्र ते सांगत असत, आता पुरे झाला तुमचा गाणं! पण सगळं समजून घेऊन त्यांनी एक छान गोष्ट करून दिली आम्हाला. झोपायच्या जागेजवळ एक सॉकेत केला, टेप रेकोर्डेर ठेवून गाणी ऐकायला. "संगीत झोप" घ्या म्हणायचे आम्हाला!

छापून आलेलं वाचायचं असं व्रत माझं, त्यामुळे पेपर मधले गाण्याची माहिती सांगणारे लेख सुद्धा वाचून झाले त्या वेळी. मग अच्युत गोडबोले-सुलभ पिशवीकर यांची लेखमाला, प्रभा अत्रेंचं पुस्तक, अरुण दाते यांचं आत्मचरित्र, संगीत नाटकांबद्दल रंजक माहिती असं सगळं वाढायला लागलं. मजा येत गेली.

आज राहुल देशपांडे यांनी गायलेली एक बंदिश ऐकली (बंदिश आणि चीज यातला फरक मला माहित नाही) आणि हे लिहावंसं वाटलं. आत्ताही काम करताना मे नेट वर किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, झाकीर हुसेन, अशा कोणाचंतरी रेकोर्डिंग लावून ठेवते.

आयुष्यात जसं पुस्तक नकळत शिरलं आणि आयुष्याचा एक भाग होऊन राहिलं, तसंच गाणंही नकळत आलं आणि मनाशी सूर जोडले गेले. मी इंजिनिअर आहे ही जशी ओळख, तशीच मला गाणं ऐकायची आणि पुस्तकांची आवड आहे ही सुद्धा ओळख मिळाली मला!

Friday, October 1, 2010

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

बरीचशी पुस्तकं...थोडीशी मी..

आज "रीटा" या सिनेमा चे ट्रेलर्स बघत होते. बघायचा आहे अजून हा सिनेमा. खरं तर बरेच दिवस झालेत तो रिलीज होऊनही...पण राहिलंय बघायचा. आणि खरं सांगायचं, तर ही रीटा मला अनोळखी नाही. १० वी नंतरच्या सुट्टीत मी भस्म्या झाल्यासारखी पुस्तकं वाचली होती. त्यातलंच हे---रीटा. १० वर्षं झाली ते वाचून. सगळा तपशील नाही आठवत त्यातला, आणि तो सिनेमा बघूनही समजेलच, पण नवल वाटतं ते एका गोष्टीचं. या विषयावरचं असं पुस्तक मी १६ व्या वर्षी वाचलं होतं..

तेव्हा काही फार समजलं नव्हतं. आणि 'हे असं का..याचा अर्थ काय आहे..असं खरंच घडतं का...असेल तर का घडतं...' असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत हे मात्र खरं. तसे मला प्रश्न कमीच पडतात अशा गोष्टीत. अनेक प्रश्नांची उत्तरं काळाबरोबर मिळत जातात, आणि ती तेव्हाच मिळणं योग्य असतं असं मला वाटतं. त्यामुळे आज जेव्हा जाणवतं, कि अरे! ही गोष्ट तर आपल्याला आधीच माहिती होती...तेव्हा कळतं की त्याचा उत्तर हे असं आहे..
त्ये सुट्टीत "कोसला" वाचली होती. तीही अशीच अंगावर आली होती. आणि मग इरावती कर्व्यांच "युगांत", थोड्या वर्षांनी "ब्लास्फेमी", "नॉट विदाउत माय डॉटर" हीपण झाली वाचून. कोसला तर अजूनही कळेल का शंकाच आहे. म्हणजे जे काही वाचतेय ते असं भयंकर वाटून सगळ्या बाजूने मला घेरतंय ही भावना आजही होईल अशी धास्ती वाटते. असं अनेक पुस्तकांचं होतं. "काश्मीर-धुमसते बर्फ" हे तर मी ५ पानांच्या पुढे वाचूच नाही शकले.
तसा मी खूप वाचलंय हे आता लक्षात येत. रिकाम्या वेळात जेव्हा हि सगळी पुस्तकं आठवतात तेव्हा जाणवत, आपण खरंच बराच वाचलंय. मन सुखावतं या जाणीवेने.

आज मला नक्की काय सांगायचं आहे, माहित नाही. पण खूप विचारांचा कल्लोळ आहे हा. एक सिनेमा निमित्त ठरला, आणि पुस्तकांची आठवण झाली. खरं तर आईची पण. तिने कधी सवय लावली समजलंच नाही. लहान असताना किशोर, कुमार हि मासिकं, चंपक, ठकठक, चांदोबा...पेपर मधल्या बातम्या, चिंटू....आणि अगदी रामरक्षा, मनाचे श्लोक, सगळं सगळं...
विषयाला कधीच बंधन नव्हतं. विनोदी, गंभीर, देवाचं, ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक, कथा, छोटे लेख...किती नि काय!

पुढे मोठं होताना हे सगळं कमी होण्या ऐवजी विस्तारत गेलं. पु लं ची मोहिनी होतीच, पण स्वाभाविक पणे वाचली जाणारी मृत्युंजय, छावा, राजा शिवछत्रपती, राधेय अशी सगळी पुस्तकं वाचून झाली. पेपर मध्ये फक्त राजकारण नसतं, अजून खूप चांगल्या गोष्टी असतात हे लोकसत्ता वाचून समजलं. शनिवार-रविवारच्या पुरवण्यांची वाट बघायला लागले मी. निबंध लिहिताना हे उपयोगी पडेल असं तर वाटायचंच, पण त्याहीपेक्षा हे आपल्याला आवडतंय हि जाणीव जास्त होती. ९ वर्षांची असल्यापासून श्रीमद भगवद्गीता वाचता आणि म्हणता येत होती, त्यामुळे मोठेपणी काही वाचताना अनेक गोष्टी लगेच लक्षात येत. त्यातले पौराणिक संदर्भ आठवत जे लहान असताना आजीने, किंवा गीता शिकवताना फडके सरांनी सांगितलेल्या गोष्टीत असत...आपण आतून कुठतरी समृद्ध होतोय असं वाटायचं.
यातल्या अनेक गोष्टींचं श्रेय आईला आणि बाबांना जातं. खरं तर मला गीता वगैरे शिकायचीच नव्हती. गीता काय असते हेही माहित नव्हतं. महाभारत बघून थोडाफार जे समजलं तेही "हि काहीतरी गुंतागुंत आहे संस्कृत मधली" असं वाटायचं. पण सरांची मुलगी आणि मी एकाच वर्गात, तेव्हा एकमेकींच्या नादाने शिकू, बोलणं, उच्चार स्पष्ट होतील असं विचार आईने आणि सरांनी केला आणि नाखुशीने मी शिकायला सुरुवात केली. पण मग मात्र गोडी वाढत गेली. ३ वर्षात ५ आणि मग ८ वीत संपूर्ण संस्कृत घेऊन केवळ आवड म्हणून उरलेले १३ अध्याय संथा घेऊन शिकून झाले. बाबांनी गीतेवर लिहिलेली टिपणांची वही मिळाली तेव्हा या सगळ्याचा सार्थक झालंय असं वाटलं.
वाचन सगळीकडून वाढत होतं. गौरी देशपांडे, सेतुमाधव पगडी...योगी अरविंद, विवेकानंद...संत चरित्र, क्रांतिकारकांच्या कथा, सुनिता देशपांडे, क्वचित कधी व पु काळे....
कुटुंब कथा, मासिकं, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, नाटक, सिनेमा, आत्मचरित्र.....लायब्ररीत जायचं, आणि निवांत हवं ते पुस्तक घेऊन यायचा. घरी आला कि जेऊन पुस्तक हातात घ्यायचा ते वाचून संपवायचं. हा झालं सुट्टीतला उद्योग. कॉलेज असला कि एखादा पुस्तक ८ दिवस पुरायचं. पण रात्री काहीतरी वेगळं वाचल्याशिवाय झोपायला जाववत नसे. एका बाजूला इन्जिनिअरिन्ग आणि दुसर्या बाजूला हे वाचन...गल्लत नाही केली कधी, पण धीम्या गतीने का असेना, पुस्तकांबारोबारचा प्रवास चालू ठेवला. शनी-रविवारच्या पुरवण्या होत्याच. त्यातून ओळख झाली अच्युत गोडबोले, मुकुंद टाकसाळे, मुकुंद संगोराम, राणी दुर्वे, शुभदा चौकर, आणि अनेक अभिनेत्यान्म्धल्या लेखकाची.

मी लहान असताना आई सांगायची, हे वाच, ते वाच, हे चांगला आहे...ते आवडेल तुला...आता मी सांगायला लागले. आई-बाबांशी बोलताना अनेक पुस्तकांचे संदर्भ आले कि त्यांना आजही बरं वाटतं.

पुस्तकांनी मला काय दिलं ते सांगता नाही येणार. मला काय येतं, काय माहिती आहे, मी किती वाचलंय...याचा हा लेखाजोखा नाही. अजून खूप काही वाचायचं आहे. एकाच वेळी अनेक विचारांचा कल्लोळ झाला कि धड काहीच नाही सांगता येत तसं झालं आज. खूप सांगायचं राहिलंय...पण मनात कुठेतरी खूप समाधान आहे. योग्य पुस्तकंची सांगत मला मिळाली याचं, आणि हे सगळं मला देणारे आई-बाबा लाभले याचं!