Friday, July 23, 2010

सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...


थंडीचा कडाका जरा कमी होईल अशा विचारात असतानाच एकदा मी खिडकीतून बाहेर बघत होते. माझा हा फार आवडीचा उद्योग झालाय आता. समोर दूरवर एम्पायर स्टेट ची बिल्डींग दिसते.... सगळा मॅनहॅटन व्ह्यू....वेळ कसा जातो कळत नाही!
....तर असाच बघत असताना खाली स्विमिंग पूल कडे नजर गेली. पूल ची साफ-सफाई चालू झाली होती. म्हणजे आता तो सुरु होणार तर...असा विचार मनात येऊन गेला. समर ची तयारी...त्या आधी स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतू! आणि एकदम नजर शेजारच्या झाडांकडे गेली. बघते तर काय!! इवली इवली पोपटी पानं वार्यावर झुलत होती!! कालपर्यंत जिथे नुसत्याच फांद्या दिसत होत्या तिथे आज चक्क पालवी फुटली होती! वसंत ऋतू, पालवी या गोष्टींचा इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. मी थोड्या वेळाने खाली गेले आणि समोरच्या बिल्डींग कडे पाहिलं, तर तिथे चेरी ब्लॉसम चं झाड फुलांनी भरून गेला होता. नाजूक फिक्कट गुलाबी फुलं! निसर्ग कात टाकतो म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष बघत होते, नव्हे, जगत होते! हा ऋत सगळ्यांना एवढं वेड का लावतो ते उमजायला लागलं होता हळू हळू. आणि मग हा रोजचाच खेळ झाला. खिडकीतून बघायचं, झाडाची पानं थोडी जास्त हिरवी दिसतात का....अजून कोणत्या झाडांना फुलं आलीयेत...कोणते रंग आहेत...
हवा जसजशी बदलत होती तशी ही रंगांची उधळण पण छटा बदलून खुणावत होती. त्यात मला सरप्राइज म्हणून विश्राम ने वॉशिंन्ग्टन डीसी ची ट्रीप काढली. तिथे या वेळी चेरी ब्लॉसम पूर्ण बहरला असणार होता. तिथे गेलो तेव्हा किती पाहू नि किती नको असं झालं होतं. खूप फोटो काढले. इतके, कि मेमरी कार्ड संपलं! त्या ट्रीप बद्दल पुन्हा कधीतरी लिहीन....
मी हवेतला हा बदल अनुभवत होते. खूप वारा, मधेच पाऊस, पराग कणांमुळे येणाऱ्या अलार्जीज, सर्दी....या काळात लोकांना हा त्रास खूप होतो. पोलन रेट म्हणजे पराग कण हवेत पसरण्याचा रेट सुद्धा हवामान अंदाजात दिलेला असायचा. सकाळी उठून पाहिलं कि पार्किंग मधल्या गाड्यांवर परागांचा हलकासा पिवळसर थर दिसे. डोळे लाल होणं, शिंका येणं, पोलन स्पेशल सर्दी :) असं काय काय नवीन नवीन कळत होतं. हळू हळू हवेतला उष्मा वाढायला लागला होता. ४ ला मावळणारा दिवस ६-७ पर्यंत पुढे गेला होता. "अजून थोडं थांब, ८ वाजता पण उजेड बघशील.." असं मैत्रिणी सांगायच्या. मला सगळ्याचं अप्रूप वाटत होतं. कितीही मोठं झालं तरी माणसातल लहान मूल कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही..तसंच माझं झालं होतं.
आणि खरंच एक दिवस आम्ही बाहेरून आलो तेव्हा रात्रीचे ८ वाजले आहेत हे केवळ घड्याळाकडे बघून कबूल करावं लागत होतं. मस्त उजेड होता बाहेर!! लोक आरामात फिरत होते, आईस क्रीम खात होते, खरेदी करत होते..
समर चालू झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जागोजागी समर सेल्स लागले होते. खरेदीची दुकानं भरून गेली होती. समर स्पेशल कपडे, खाद्यपदार्थ, आणि बरंच काय काय.....बगीचे उघडले होते, वेळा बदलून रात्री ८ पर्यंत केल्या होत्या. आमच्या सोसायटीचा बगीचा पण फुलांनी आणि मुलांनी भरून गेला! मग खूप भारतीय लोक तिथे दिसू लागले. ओळख नसतानाही ओळखीचं हसू लागले. असं बाहेरच्या देशात आल्यावर मग किंमत कळते कधी कधी.
माझ्या मनात विचार चालू झाले. (ही पण एक सवय इथे येऊन वाढली आहे. दिवसभर एकटीच असल्यामुळे आपुला संवाद आपल्याशी असं चालू असतं. मन म्हणजे लायब्ररी झाली आहे. वाट्टेल त्या विषयावरचं पुस्तक चालू असतं)
स्प्रिंग-वसंत म्हणजे अवखळ बाल्य जणू! खट्याळ....नाजूक आणि हवाहवासा वाटणारा. लहान बाळासारखा अल्लड. मनस्वी. हवापण तशीच. कधी सोसाट्याचा वारा, कधी पावसाच्या धारा...आकाशात रंगांचा गालीचा पसरलेला. एखाद्या चित्रकाराने कसल्यातरी विलक्षण आवेगाने कुंचल्याचे फटकारे मारावेत तसे मावळतीचे आणि उगवतीचे रंग....परागांचा पिवळसर शेला.
साधारण मार्च महिन्यात हि वसंताची चाहूल लागते...म्हणजे वर्षाचा तिसरा महिना..जणू सृष्टीलाच तिसरा महिना असावा....सगळी हवा अशी कि 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ सुंदर मोहकतेने' आपल्या साद घालते आहे असं वाटावं....

आणि मग येणारा समर...तारुण्याचा जल्लोष...उत्साहाचा मूर्तिमंत झरा!! सकाळी ६ ला उजाडणारा दिवस रात्री ८ ला मावळणार! आपल्या आयुष्यातला जसा तारुण्याचा काळ सगळ्यात मोठा तसाच हा समर सुद्धा. कर्तृत्वाची साक्ष मिरवणारा.
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत....उठा, जागे व्हा, चांगल्या कामाचा आशीर्वाद मिळावा असं सांगणारा...खूप काम करा, आयुष्याचा आनंद घ्या, भरपूर फिरा, खूप बघा, ऐका, अनुभवा.....जगा!

आणि मग येतो तो हेमंत...हेमंत म्हणजे 'हेम आहे अंती ज्याच्या असा तो' हा बहुव्रीही समास काय तो सोडवलेला शाळेत असताना...पण झाडांच्या शेंड्यांवर खरंच सोनं उधळव तसा हेमंत पाहायला मिळतो तो इथेच. खरं तर इथे या ऋतूला फॉल म्हणजे पानगळीचा ऋतू म्हणतात..म्हणजे आपला शिशिर ऋतू...ते काहीही असो...ती रंगांची शोभा बघावी ती इथेच. पिवळा, गुलाबी, क्वचित निळा सुद्धा रंग असतो पानांना. आता थोडे दिवसांनी मलाही बघायला मिळेल. मी बघितलाय ते फक्त विश्राम ने काढलेल्या फोटो मधून. आता या वेळी मला प्रत्यक्ष बघायला मिळेल.

आणि पानगळ झाली कि मात्र सगळं भकास होऊन जाईल...पर्णहीन झाड...पक्षी नसलेले बगीचे..आणि मुलं आणि फुलं नसलेली पार्क्स...पुन्हा एकदा ४ वाजताच होणारा अंधार...आणि त्या अंधारात हरवून जाणारी मायानगरी अमेरिका!!

शतकानुशतकं हे ऋतुचक्र चालू आहे, चालू राहणार आहे......आपल्या आयुष्यासारखाच. बाल्य, तारुण्य, हेमंतासारखा परिपक्व नितांत सुंदर असा उतरवायचा काळ, आणि मग सन्यस्त वृत्ती दाखवणारा हिवाळा...विरागी....पांढरा शुभ्र. हिमालयाच्या पावित्र्याची आठवण करून देणारा.
तसा पाहिलं तर एक भौगोलिक सत्य, पण नीट विचार केला, तर हेच ऋतुचक्र आपल्याला जगण्याची कला शिकवून जातं!!

No comments:

Post a Comment