Friday, February 11, 2011

सर्दी- एक वाहता अनुभव

आक्छ्यी!!!आक्छ्यी....आक्छ्यी..!!!!!...........

एका सुखद वीकांताच्या सुसकाळी मी ६ शिंकांची सलामी दिली. सर्दीने वाजतगाजत आपल्या मुक्कामाची वर्दी दिली.
खरंतर सर्दी माझी खूप जवळची, जुनी मैत्रीण आहे. आली की ४-५ दिवस खूप लाडाने पाहुणचार करून घेतेच ती! पण सायनस ची पीडा म्हणून आली तरी सायलेंट मोडवर असते. म्हणजे डोकं जड, नाक ब्लॉक झालेलं, आवाज खर्जात गेलेला असा प्रकार असतो. शिंकांची फैर वगैरे नसते कधी. याच वेळी कय बाई हे नवीन, म्हणून मी विचारात पडले!

साधारण ११ वाजता हा प्रकार घडला. संकष्टीचा उपास नव्हता, पण आवडते म्हणून साखि करायची होती संध्याकाळी. साबुदाणा भिजत घातला होता. नवरा काही कामासाठी गेला होता, त्याचं काम झालं की मला फोन करणार होता. मग मी साखि करून घेऊन जायचं असं ठरलं होतं. न्यूयॉर्कात फिरताना मी बरेचदा असं काहीतरी खायला करून घेऊन जाते.
..पण अचानक आलेल्या या पाहुणीमुळे सगळा प्लॅन बदलतोय की काय अशी भिती वाटायला लागली मला. १२-१२:३० ला जेवण झालं की बरं वाटेल म्हणून लक्ष नाही दिलं. पण भूकच नाही की हो लागली! डोकं जड झालंय नं, त्यामुळे होत असेल असं, म्हणून मग वाफ घ्यायचं ठरवलं.

मग एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून लग्गेच मी नाकाला आणि कपाळाला विक्स चोपडलं. घरात अस्वस्थ फेर्‍या मारायला लागले. काय करांवं बरं...
अशी कशी झाली सर्दी!!
इतकी भरमसाठ नाही खाल्ली काही मी द्राक्षं!
जरा कुठे बाहेर गेले, -६ सेल्सिअसमधे, तर असा त्रास का व्हावा! ही काही पहिली थंडी नाही माझी इकडची!
आता जरा बरं वाटतं म्हणून ऊन ऊन पाण्याने जास्त वेळ केली म्हणते मी आंघोळ, पण म्हणून लग्गेच सर्दी!! हरे राम!
तरी बरं, आईस्क्रीम नाही खाल्लंय अजून....
आता हा अनुभव माबोवर टाकावा काय!
काय म्हणून टाकावा...ललित...की विनोदी..की आरोग्य मधे? की विरंगुळ्यात?
पण विनोदी लिहिलंय कुठे कधी!! "छान प्रयत्न आहे, अजून थोडे पंचेस हवे होते" ही प्रतिक्रिया नक्की रिपीट होईल...
ललित काय...एक चिमुकला अनुभव, जो सगळ्यांना येतो...तो मी काय वेगळा म्हणून लिहिणार!!
मग एक हृद्य का काय म्हणतात तसलं काही लिहावं काय! पण सर्दी हृद्य कुठे, नस्य आहे ना!! मग तसला विभाग नाहीच की माबोवर!!
आणि लिहिलं तरी काय म्हणून लिहावं! काय लिहावं पेक्षा याच प्रश्नाने डोक जास्त जड झालं माझं!
"उगिच आपली बोटं बडवली आणि कुटाळकी* केली" असं होणार बहुतेक...

(कुटाळकी=कीबोर्डावर टायपून केलेली वाङमयनिर्मिती. पुलंनीच एका ठिकाणी "टाईप करणे" याला गमतीत "कुटणे" म्हटलंय. त्यावरून सुचलेला शब्द)

दोन सुयांच्या कचाट्यात सापडलेल्या लोकरीच्या धाग्याचा गुंडा कसा घरंगळत जातो आणि जास्त गुंततो, तसं झालं माझ्या विचारांचं.
ठाण्...ठाण्....
खळ्ळ्..खळ्..

हे काय!! मला ताप बिप आला की क्कॉय!! म्हणजे अंग गरम होऊन सर्दी आतल्या आत का उकळतेय! आणि डोक्यातून असे आवाज का येतायत!!

आणि एकदम माझी तन्द्री मोडली....गॅसवरचं पाणी उकळलं होतं, आणि त्यावर अर्धवट ठेवलेलं झाकण ठणठणत होतं.
मी चटकन पातेलं खाली टेबलवर घेतलं, निलगिरीचे २-३ थेंब टाकले त्यात, आणि स्कार्फने चेहरा वगैरे झाकून वाफ घ्यायला सुरुवात केली.

अहाहा....काय ऊबदार वाटतंय!
सगळा सायनस पोर्शन कसा शेकून निघतोय छान..("अगं शहाणे...एवढं सगळं कळतंय..तर रोज कर की प्राणायाम! कपालभाती...भस्त्रिका, उज्जयी, शिवाय जलनेती...करायचं तर काही नाही..उगिच आपली बॅडबॅड.." हे दुसरं मन नावचं अवसानघतकी प्रकरण )
नाक कसं हलकं वाटतय आता...डोकंही ठणकायचं कमी होतय बहुतेक.. ("काही नाही...उगिच भास आहे हा! ३-४ दिवस तरी त्रास होणारच! व्यायाम करायचा नाही...मग असंच होणार"..दु.म.ना.अ.प्र.)
आता पाणी जरा कोमट झालंय...मग कान पण शेकावा...मान वळवून कानाला शेक द्यावा..मगाशी शिंक आली तेव्हा कानात दडा बसला होता, जांभई दिल्यावर सुटला. ("तुला ना आळसच भारी...जांभईचं फक्त निमित्त..."दु.म.ना.अ.प्र.)

शेवटी पाणी गार होत आलं तेव्हा हा कार्यक्रम (दोन मनांच्या जुगलबंदीसकट) संपला.
आता तरी भूक लागेल अशी आशा मात्र मावळली. खायची इच्छाच होईना!

असेच २-३ तास गेले. एव्हाना सर्दीने बाडबिस्तरा चांगलाच पसरला होता. डोळ्यांतूनही पाणी वहायला लागलं होतं. अगदी रडवेली दिसत होते मी!

पुन्हा ३ तासांनी वाफेचा कार्यक्रम झाला. या वेळी भूक नाही, पण झोप मात्र नक्की यायला लागली.
"असा काय हा....किती वेळ लागेल माहिती नाही पण निदान एक फोन तरी करायचा!!" म्हणून नवर्‍यावर रागही काढून झाला!! अर्ध्या तासाचं उताणं, पालथं, कुशीवरचं वगैरे शवासनही करून झालं! (म्हंजे झोप हो!!)

मग मात्र मीच फोन करून "घरीच ये, मला सर्दी झालिये, आणि बाहेर -११ से. आहे, नको जाऊया" असं नवर्‍याला सांगितलं. आला बिचारा.

-----------

त्याच वीकांताच्या दुसर्‍या सकाळी मी उठल्या उठल्या नवर्‍याला म्हटलं, "मला ना, डोक्यावर काठोकाठ भरलेला माठ ठेवलाय असं वाटतंय.."आणि परत आडवी झाल्ये!
"देवा! झोपेत पण हिला उपमा वगैरे सुचतायत...कसं होणारेय तुलाच माहित!" वगैरे विचार नक्की आले असतील ह्याच्या मनात!

उठल्यावर सगळं आवरलं, खाणं झालं, पण कसलीच चव कळत नव्हती. रोजच्या वरणभाताचा कंटाळा आला होता, सांबार करायचा बेत केला. पण सांबाराची चव घेताना काय कमी आहे, काय जास्त झालंय..काहीही कळेना! एरव्ही नुसत्या वासाने मीठ कमी-जास्त आहे का कळतं मला (सवयीच्या पदार्थांमधलंच फक्त) पण आज चवीनेही कळेना!
पुलंची आठवण झाली. सर्दी झाली की पोळी खाल्ली काय, नि पोस्ट्कार्ड खाल्लं काय..एकच! हे त्या क्षणी पटलं मला!

अखंड शिंका...दर २ तासांनी नवीन पेपर टॉवेल...

वाफ घेऊन उजळलेला चेहरा(इश्श्य!)..लालबुंद झालेलं नाक आणि गाल..पाणीदार डोळे...
"असा मेकप लग्नात सुद्धा टिकत नाही नै!!" हे माझंच निरीक्षण!

हं!
रविवारसुद्धा असाच नाकाने वाहता ठेवला.

सोमवारी जऽऽऽरा कमी आहे सर्दी असं वाटलं. संध्याकाळी मैत्रिणीचा फोन, कशी आहेस विचारायला. तिने घरगुती ह्युमिडिफायर म्हणून साध्या नॉर्मल टेंपरेचरच्या पाण्याने ३/४ भरलेली बादली कोपर्‍यात ठेवायला सांगितली.
हा उपाय मानवला, आणि सर्दीचे माघरपणाचे ३ दिवस संपले म्हणून तिनेही निरोपाचे भैरवी आळवायला घेतली.
आता बरीच कमी झाली सर्दी...
सासरी चालली आहे परत ती..जाताना तहानलाडू, भूकलाडू करायला हवेत तिच्यासाठी!
अजून भैरवी संपली नाहिये, उलट आता भेट (बहुतेक) पुढच्या वर्षी म्हणून एकएक सूर आळवणं चाललंय!
पण मैफीलीची सांगता होतेय..
बरंय..

पुन्हा भेट होईल तेव्हा नवीन काही असेल बहुतेक...



--------------मायबोलीवर पूर्वप्रकाशित
http://www.maayboli.com/node/23007